Namrata Sambherao Birthday : मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणून नम्रता संभेरावला ओळखलं जातं. ‘फू बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांमुळे अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेली अनेक वर्षे आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. आज नम्रता तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे.
सिनेविश्वातील बरेच कलाकार एकमेकांचे घट्ट आणि खूप जवळचे मित्र आहेत. गेली अनेक वर्षे अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांची देखील खूप चांगली मैत्री आहे. आज लाडक्या मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
नम्रतासाठी प्रसादची खास पोस्ट
प्रसाद खांडेकरने सुंदर अशी पोस्ट लिहित नम्रताला ( Namrata Sambherao ) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता लिहितो, “आज ‘महाराष्ट्र हास्यजत्रा’ मधील लॉली, सुरकी, बॉस, अगं अगं आई, बुधिया बॉस, शालू, चांदणी, शितली अशा अनेक… तसेच कुर्रर्रर्रर्र मधील पूजा, घुमा, अश्विनी आणि अनेक पात्रांना जन्म देणाऱ्या नमाचा वाढदिवस!”
“नमा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा! तुला हवं ते सगळं मिळो… तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत. अजून किमान लाखभर कॅरेक्टर मिळो, हजारो पासपोर्ट भरत तुला जगभर फिरायची संधी मिळो… हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अशीच हसत राहा, वेडेपणा जन्माला घालत राहा आणि अशीच मैत्री जपत राहा. माझ्या या जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा! खूप खूप खूप प्रेम नमा” असं पोस्ट शेअर करत प्रसादने नम्रताला ( Namrata Sambherao ) शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : ठरलं तर मग : सायलीची मृत्यूशी झुंज तर, प्रतिमाचा जीव धोक्यात…; ‘या’ दिवशी असणार महाएपिसोड; पाहा जबरदस्त प्रोमो
दरम्यान, यापूर्वी ‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सुद्धा प्रसाद खांडेकरने नम्रतासाठी ( Namrata Sambherao ) खास पत्र लिहून तिचं कौतुक केलं होतं. ‘नाच गं घुमा’ चित्रपटात मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव या दोन दमदार अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर देखील चांगलं यश मिळालं होतं.