‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून अभिनेत्री नम्रता संभेराव हिला एक वेगळी ओळख मिळाली. आज तिच्या विनोदी शैलीचे लाखो चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये नम्रता साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवतं. तर सध्या त्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणातून थोडा ब्रेक घेऊन तिच्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त अमेरिकेला गेली आहे. या दरम्यान तिने पोस्ट केलेला एक फोटो आता खूप चर्चेत आला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नम्रताचा चाहतावर्ग खूप वाढला आहे. नम्रता देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आता अमेरिका दौऱ्याला गेल्यानंतर नम्रता विविध फोटो व्हिडीओ पोस्ट करत त्यांची ट्रीप कशी सुरू आहे हे चाहत्यांना दाखवत आहे. तर सध्या ते कॅलिफोर्निया येथे आहेत. कॅलिफोर्नियामधील लॉस एंजलिस येथे असलेल्या ‘डॉल्बी थिएटर’ला त्यांनी नुकतीच भेट दिली. या ठिकाणी ऑस्कर सोहळा होतो. या थिएटरबाहेरचा एक फोटो पोस्ट करत नम्रताने तिची मनातली इच्छा व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : नम्रता संभेरावच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले, “हा तर विराट कोहली!”

नम्रताने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये ती या थिएटरच्या बाहेर उभी असलेली दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “इथे ऑस्कर सोहळा पार पडतो. लवकरच इथे पाय रोवायचेत…स्वप्न.” असं म्हणत तिने कॅप्शनबरोबर हार्ट इमोजीही दिले. तिची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

हेही वाचा : Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाठोपाठ नम्रता संभेराव आता मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज, प्रोमो व्हायरल

तिने हा फोटो पोस्ट करतात तिच्या चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अनेकांनी तिच्या कामाचं कौतुक केलं. तर काहींनी “तुझी ही इच्छाही लवकर पूर्ण होवोत,” असं म्हणत तिला शुभेच्छा दिल्या. तिच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतील तिच्या मित्रमंडळींनी देखील या फोटोवर कमेंट करत फोटो आवडल्याचं सांगितलं आहे.