‘जिच्या विनोदाला नाही ठाव’, अशी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करीत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव (Namrata Sambherao). ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि अशा अनेक कार्यक्रमांमधील विनोदी अभिनयाने तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आपल्या विनोदाच्या उत्तम टायमिंगच्या जोरावर तिनं प्रेक्षकांना भरभरून हसवलं आहे. तसेच चित्रपटांमधील तिच्या काही भूमिकांमुळे नम्रताच्या अभिनयाचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.

अनेक मालिका, नाटक व चित्रपटांमधून काम करीत नम्रतानं आज सिनेसृष्टीत स्वत:चं नाव कमावलं आहे. पण, या हरहुन्नरी अभिनेत्रीला स्वत:च्या लेकानं नाटकात काम न करण्याचा सल्ला दिला होता. त्याबद्दल स्वत: नम्रतानं वक्तव्य केलं आहे. नुकताच ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळा पार पडला. तेव्हा नम्रतानं ’राजश्री मराठी’शी साधलेल्या संवादात याबद्दल सांगितलं आहे. यावेळी नम्रतानं लेकानं दिलेल्या या सल्ल्याबद्दलचा किस्सा सांगितला.

हा किस्सा सांगताना नम्रता म्हणाली, “कुर्रर्रर्र नाटकाच्या एका प्रयोगाला मी त्याला माझ्याबरोबर घेऊन गेले होते. तेव्हा तो मध्यंतरात माझ्याकडे रडत रडत आला आणि म्हणाला की, आई तू नाटकात काम नाही करायचं. तेव्हा मला असं झालं की, हा मला असा का बोलत आहे. त्यावर तो मला म्हणाला की, आई, मी तुला रडताना नाही बघू शकत आणि तेव्हा तर तो चार वर्षांचाच होता”.

पुढे नम्रता असं म्हणाली, “माझ्यासाठी ही माझ्या कामाची पावतीच आहे. माझ्या मुलाला मी केलेला अभिनय इतका खरा वाटतो. त्याला त्याबद्दलच्या भावना आहेत आणि तो इतका विचार करतोय. त्यामुळे मला हे खूपच आवडलं होतं आणि त्याच्याकडून मला माझ्या कामाची मिळालेली ही पहिली दादच आहे”.

यापुढे नम्रतानं लेकाच्या मनोरंजन क्षेत्रात येण्याविषयी असं म्हटलं, “तो या क्षेत्रात येईल किंवा नाही ते माहीत नाही. याबद्दल मी अजून विचार करीत नाही. त्याला या क्षेत्रात यायचं असेल आणि हे जेव्हा मला कळेल तेव्हा मी त्याला नक्कीच मार्ग दाखवेन. शून्यापासून जग निर्माण करायचं आहे. कारण- त्याची आपण नोंद ठेवत असतो. त्यामुळे मला त्याला हेच शिकवायचं आहे.”

दरम्यान, नम्रताच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याशिवाय तिनं ‘व्हेंटिलेटर’, ‘नाच गं घुमा’, ‘वाळवी’, ‘एकदा येऊन तर बघा’ यांसारख्या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांसाठी तिचं कौतुकही झालं आहे. त्याशिवाय तिचं ‘थेट तुमच्या घरातून’ हे नाटकही रंगभूमीवर सुरू आहे.