अभिनेत्री नम्रता संभेरावने वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नम्रताला सर्वत्र ‘लॉली’ ही नवीन ओळख मिळाली. गेल्या काही वर्षांत कॉमेडी शोजच्या बरोबरीने ती अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना दिसली. नम्रता यशस्वी अभिनेत्री आहेच पण, वैयक्तिक आयुष्यात तिने एक पत्नी, आई, मैत्रीण अशा सगळ्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळल्या आहेत.

नम्रताने वैयक्तिक आयुष्यात २०१३ मध्ये योगेश संभेराव यांच्याशी लग्नगाठ बांधली. या जोडप्याला रुद्राज नावाचा गोंडस असा मुलगा आहे. आज रुद्राजच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत नम्रता संभेरावने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री नम्रता संभेरावची पोस्ट

माझ्या रुद्राजचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा…
किती समजूतदार आहे रुद्राज अवघ्या ६ वर्षांचा मुलगा एवढा समजूतदार कसा काय असू शकतो याचं मला खरंच नवल वाटतं… त्याने फक्त बोलावं आणि आम्ही ऐकावं असं गोडुलं लेकरू माझ्या पोटी जन्माला आलंय याचा मला अभिमान आहे.

रुद्राज : आई तू शूटिंगला असते नं तेव्हा मला तुझी खूप आठवण येते.
मी : ठीक आहे मग मी नाही जाणार कामावर तुझ्याबरोबर राहते दिवसभर
रुद्राज : नको आई मग तुला अवॉर्ड कसं मिळणार…

असे अनेक अविस्मरणीय क्षण रोज माझ्या नशिबात येतात रुद्राजमुळे… किती आणि काय कौतुक करू अजून तुझं?
खूप मोठा हो यशस्वी हो आणि सगळ्यात महत्वाचं उत्तम माणूस हो…
मी : रुद्राज तू फक्त माझं बाळ आहेस…
रुद्राज : नाही आई मी सगळ्यांचा आहे.
त्यामुळे अशा या सगळ्यांच्या लाडोबाला खूप प्रेम
-आई Love You.

नम्रता संभेराव आणि तिचा लेक रुद्राज यांच्यातले हे गोड संवाद वाचून नेटकरी सुद्धा भारावून गेले आहेत. अभिज्ञा भावे, प्रार्थना बेहेरे, पियुष रानडे, वनिता खरात, सुकन्या मोने, सलील कुलकर्णी यांनी रुद्राजवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नम्रताला ‘नाच गं घुमा’साठी पुरस्कार मिळाला. शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने अभिनेत्री या सोहळ्याला उपस्थित राहू शकली नव्हती. त्यामुळे अभिनेत्रीऐवजी या सोहळ्यात तिचे पती योगेश संभेराव व लेक रुद्राज हे दोघं उपस्थित होते. रुद्राजने आपल्या आईच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला होता. यावेळी सुद्धा नम्रताने लेकासाठी सुंदर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या होत्या.

Story img Loader