नाना पाटेकर ‘कौन बनेगा करोडपती १६’ मध्ये हजेरी लावणार आहेत. ते ‘वनवास’ चित्रपटाचे कलाकार उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्याबरोबर या शोमध्ये उपस्थित राहणार आहेत. नाना पाटेकर होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसल्यावर अनेक विषयांवर गप्पा मारताना दिसणार आहेत.
नाना पाटेकर आता गावात राहतात. यासंदर्भात अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारला. ‘आपण गावातच राहायला हवं, असं तुम्हाला कधी वाटलं?’ यावर नाना म्हणाले, “मी इथला नाहीच, मी गावाकडचा माणूस आहे. मी इकडे काम करतो आणि परत गावी जातो. मी गाव-खेड्यात राहतो आणि तिथेच राहणार, तिकडेच मला बरं वाटते.” नंतर नाना पाटेकर प्रेक्षकांना उद्देशून म्हणाले, “मी बच्चन यांना विचारलं की, ‘तुम्ही इतकं काम का करता? गावात येऊन आठवडाभर राहा. तिकडे फारच निवांत वाटतं. त्यावर त्यांनी मला सांगितलं की, ते दिवासातले १२ तास काम करतात. त्यासाठी मी त्यांच्यापुढे खरंच नतमस्तक आहे.”
नाना पाटेकरांचं बोलणं ऐकून बिग बी प्रभावित झाले आणि म्हणाले, “असं वाटतं की पुन्हा त्या वातावरणात जाऊन राहावं. आता मी समजू शकतो की तुम्ही परत का गेलात!” त्यानंतर बच्चन यांनी नाना पाटेकरांना विचारलं की, गावातली त्यांची दिनचर्या कशी असते. त्यावर नाना पाटेकर म्हणाले, “मी सकाळी उठतो, तिकडे मी स्वतःचे एक जिम बनवले आहे. माझ्याकडे दोन गाई आणि एक बैल आहे. तिथे मीच सगळं काही करतो. नाश्ता, जेवण – माझं सगळे जेवण मीच बनवतो. मी खरोखर चांगले जेवण बनवतो.”
हेही वाचा – ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
मी चित्रपटात करिअर करू शकलो नसतो तर…
पुढे नाना म्हणाले, “कधी कधी तर मला वाटतं की, जर मी चित्रपटात करिअर करू शकलो नसतो, तर मी एक छोटेसे हॉटेल उघडले असते. पण, मी जितकी अपेक्षा केली होती, त्यापेक्षा आयुष्याने मला खूप जास्त दिले आहे. माझ्या गरजा अगदी साध्या आहेत. संध्याकाळी, माझ्या सोबतीलe पुस्तकं असतात. काही मी वाचली आहेत, काही वाचलेली नाहीत. चार पाच कपाटं भरून पुस्तकं आहेत. शहरात आपल्याकडे भिंती असतात, माझ्या गावात डोंगर आहेत. मी डोंगरांमध्ये राहतो. तिथलं आयुष्य खूप सोपं आहे. तिथे अलार्मसाठी घड्याळ लागत नाही. सकाळी पक्षी मला उठवतात. आमच्याकडे कधीकधी मोरसुद्धा येतात.”
नाना पाटेकरांचं बोलणं ऐकून बच्चन म्हणाले, “कधी तरी यायलाच हवं तुमच्याकडे.” यावर नाना पाटेकर म्हणाले, “अर्थात. नक्की या. मी नेहमी माझ्या मित्रांना सांगतो की हे घर माझ्या एकट्याचे नाही. ते तुमचेही आहे. तुमचंच घर समजून या आणि राहा.”
नाना पाटेकर नाम फाऊंडेशनसाठी निधी उभारण्यासाठी केबीसीमध्ये खेळले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठीही ते जागरूकता करतात. तुम्हाला आज ‘कौन बनेगा करोडपती १६’ चा हा खास भाग सोनी टीव्हीवर पाहता येईल.