छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यंदाच्या पर्वात सेलिब्रिटींसह राजकीय नेतेही हजेरी लावणार आहेत. नवीन पर्वाच्या पहिल्या भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अवधूत गुप्तेने बोलतं केलं होतं. आता केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये सहभागी होणार आहेत.
झी मराठी वाहिनीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन नवीन भागाचे काही प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आले आहेत. नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या एका व्हिडीओत नारायण राणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओत नारायण राणेंनी कोकणातील त्यांचं घर जाळण्यात आलेलं त्यावेळचा भावनिक प्रसंग शेअर केला आहे.
नारायण राणे म्हणतात, “त्यावेळी मी औरंगाबादला होतो. माझ्या रवी नावाच्या मित्राने मला सकाळी ४ वाजता उठवलं. तुझं घरं जाळल्याचं टीव्हीवर दिसतंय, असं तो मला म्हणाला. तेवढ्यात बाळासाहेबांचा फोन आला. ‘तुझं घर जळतंय, ते मी पाहतोय. लक्षात ठेव सोनं जेव्हा जळतं, तेव्हा ते जास्त उजळतं’, असं मला ते म्हणाले.”
हेही वाचा>> एकनाथ शिंदेंच्या बंडावर नारायण राणेंनी केलं भाष्य, म्हणाले, “मी शिवसेनेत असतो तर…”
‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये नारायण राणेंनी शिवसेना, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची बंडखोरी याबाबतही भाष्य केलं आहे. येत्या १८ जूनला हा भाग झी वाहिनीवर रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.