‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य.’ अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते-केळकर, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे अशी जबरदस्त कलाकार मंडळी या मालिकेत पाहायला मिळाले होते. ऑगस्ट २०२२मध्ये सुरू झालेल्या ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेने एक वर्ष चार महिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आनंदी, रमा, राघव, सुलक्षणा, वर्षा, रेवा अशी मालिकेतील अनेक पात्र घराघरात पोहोचली. तसंच नवनवीन ट्विस्टमुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. पण, ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेने २३ डिसेंबर २०२३ला प्रेक्षकांचा निरोप घेतला. याच मालिकेतील एका अभिनेत्रीची ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अशोक मा.मा.’ मध्ये जबरदस्त एन्ट्री झाली आहे.
काही महिन्यांपूर्वीच ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘अशोक मा.मा.’ मालिका सुरू झाली. अभिनेते अशोक सराफ, नेहा शितोळे, रसिका वाखरकर असे अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. २५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू झालेल्या ‘अशोक मा.मा.’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘अशोक मा.मा.’ मालिकेत आता ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सुलक्षणा म्हणजेच अभिनेत्री वर्षा दांदळे ‘अशोक मा.मा.’ मध्ये झळकल्या आहेत.
‘अशोक मा.मा.’ मालिकेत वर्षा दांदळे राधा मामीच्या भूमिकेत झळकल्या आहेत. मालिकेत राधा मामीसह किशाकाकांची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. ‘अशोक मा.मा.’ मालिकेच्या सेटवरील राधा मामी या भूमिकेसाठी तयारी करतानाचा वर्षा दांदळेंचा पडद्यामागचा व्हिडीओ समोर आला आहे.
दरम्यान, वर्षा दांदळे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी बऱ्याच मालिकांसह चित्रपटातही काम केलं आहे. वर्षा दांदळे यांची ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेतील वच्छी मावशीची भूमिका खूप गाजली होती. याशिवाय त्यांनी हिंदी मालिकाविश्वातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘गठ बंधन’, ‘दिल ढूंढता है’ मालिकेत वर्षा दांदळे झळकल्या होत्या.