‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत काही दिवसांपूर्वी मोठा ट्विस्ट आला होता. अभिरामची पहिली पत्नी अंतराची मालिकेत एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. आजी लीला-अभिरामसह मंदिरात गेल्या असताना आजींना अंतरा दिसते तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो, अंतरा अचानक इतक्या वर्षांनी परत कशी आली असा प्रश्न त्यांना पडतो आणि आता तिच्या येण्याने अभिराम-लीलाच्या नुकत्याच सुरू झालेल्या संसाराची काळजी वाटते. असं मालिकेतील पूर्व भागांमध्ये पाहायला मिळालं होतं

काही दिवसांपूर्वी दुर्गा व किशोर यांच्यामुळे अभिराम-लीलामध्ये दुरावा आला. लीला जहागीरदारांचं घर सोडून पुन्हा तिच्या माहेरी गेलेली पाहायला मिळालं. परंतु, सरोजिनीची तब्येत बिघडल्याने अभिरामने लीलाला पुन्हा बोलावून घेतलं. अशातच आता ‘झी मराठी’ वाहिनीने एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये लीला अभिरामला सांगते की, ”मला असं वाटतं आजी आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत.” यावर अभिराम “असं असेल तर आपल्याला तिच्याशी स्पष्ट बोलावं लागेल” असं म्हणताना दिसत आहे. पुढे लीला म्हणते, “आजी त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे ते सांगतच नाही; मी त्यांच्यामागे त्यांच्या नकळत मंदिरात जाते, तिथे गेल्यावरच आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.” आजी अभिराम-लीलापासून लपवत असलेलं गुपित त्यांना कळणार का? अंतराचं सत्य समजल्यानंतर अभिराम-लीलाची प्रतिक्रिया काय असेल? अंतराच्या येण्याने लीला-अभिराम कायमचे दुरावले जातील का? हे पाहणं रंजक ठरेल.

समोर आलेल्या प्रोमोखाली प्रेक्षकांनी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओखाली ”अंतरा दाखवायला लागल्यापासून आजी किती उदास आहेत, हे आम्हाला आवडत नाही”, लीलाबरोबर त्या किती छान होत्या, त्या दोघींना बघायला आवडतं आम्हाला, हे लवकर संपवा”, ”आजी आणि लीला बेस्ट फ्रेंड आहेत. एजे-लीलाची लव्हस्टोरी बघायला आवडेल, अंतराची नाही” असं म्हणत मालिकेच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, मालिकेच्या सुरुवातीला कथानकामध्ये अभिराम-अंताराचं लग्न झालं असून पुढे अंतरा अभिरामच्या आयुष्यातून निघून गेलेली असते असं पाहायला मिळतं. परंतु, आईच्या हट्टामुळे अभिराम दुसरं लग्न करतो आणि लीला-अभिरामचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर लीला अभिरामच्या प्रेमात पडते आणि अभिरामसमोर तिच्या प्रेमाची कबुलीही देते. पण, अभिराम तिला त्याचं अंतरावरच प्रेम असल्याचं सांगतो; मात्र नंतर अभिरामही लीलाच्या प्रेमात पडताना पाहायला मिळतं. तर काश्मीरला जाऊन दोघे एकमेकांसमोर प्रेमाची कबुलीही देतात. पण, आता अंतराच्या परत येण्याने या दोघांचा संसार मोडणार का? आणि मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.