Bigg Boss Marathi 5 वे पर्व सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. स्पर्धकांचे एकमेकांशी होणारे भांडण, वाद-विवाद, बिग बॉसने सदस्यांना दिलेले टास्क, त्यादरम्यान घडलेल्या गमती-जमती, भाऊच्या धक्क्यावर घेतली जाणारी ‘शाळा’ आणि घरात येणारे पाहुणे यांमुळे हा शो सातत्याने चर्चेत असतो. आता बिग बॉस मराठीच्या घरात ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची टीम हजेरी लावणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नवरा माझा नवसाचा २’मधील कलाकारांची हजेरी

‘कलर्स मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला, बिग बॉसने नवरा माझा नवसाचा २ या सिनेमातील कलाकारांचे स्वागत केले आहे. सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी या कलाकारांनी बिग बॉसच्या घरात हजेरी लावली आहे. ते घरात येताच सर्व स्पर्धकांनी उभे राहून त्यांचे स्वागत केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटातील ‘डम डम डम डम डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे’ या गाण्यावर कलाकारांसह सर्व स्पर्धकांनी ताल धरल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. या कलाकारांच्या उपस्थितीत घरात एक टास्क रंगला आहे. ‘स्वाद खुळा’ असे या टास्कचे नाव आहे. सर्व जण या टास्कचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठीने, ‘घरात धमाल पाहुणे येणार, टास्क खूप टेस्टी होणार’, अशी कॅप्शन दिली आहे.

या आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी घडल्याचे पाहायला मिळाले. अरबाज पटेल हा दुसऱ्यांदा घराचा कॅप्टन झाला आहे. घरात वाइल्ड कार्ड म्हणून आलेला संग्राम चौगुले वैद्यकीय कारणांमुळे घराबाहेर पडला आहे. त्याने घरात प्रवेश केल्यानंतर खेळात मोठा बदल होईल, असे म्हटले जात होते; मात्र तसे घडले नसल्याने संग्राम चौगुलेच्या खेळावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी दर्शविल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: श्रुती मराठेच्या मालिकेने अवघ्या तीन महिन्यात घेतला प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्याने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाला, “अत्यंत वेदनादायी…”

महत्त्वाचे म्हणजे रितेश देशमुख या आठवड्यात कामानिमित्त परदेशात असल्याने त्याच्या जागी नीलेश साबळेने सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली आहे. याबरोबच घरात पत्रकार परिषददेखील पार पडली असून, पत्रकारांनी स्पर्धकांना त्यांच्या खेळाविषयी अनेक प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, आता बिग बॉस मराठीच्या घरात पुढे काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navra maza navsacha 2 actors at bigg boss marathi 5 house entertaining task ashok saraf watch nsp