‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एकाचवेळी असंख्य घडामोडी घडत आहेत. जहागीरदारांच्या घरात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जहागीरदारांना एक गोड बातमी सुद्धा मिळणार आहे. दुर्गा लवकरच आई होणार आहे.
तर, दुसरीकडे एजेच्या पहिल्या बायकोने म्हणजेच अंतराने मालिकेत पुन्हा एन्ट्री घेतली आहे. अंतराच्या येण्याने एजे-लीलाच्या नात्यात काय बदल घडतील हे वेळच सांगेल. पण, सध्या गुढीपाडवा दोघेही एकत्र साजरा करत आहेत. एजे आणि लीला गुढी उभारतात. सकाळपासून लीलाच्या हातून काही ना काही विचित्र गोष्टी घडत असतात, त्यामुळे सरोजिनीला सुद्धा वाटत असतं काहीतरी चुकीचं घडणार आहे. एजे, लीला आणि सरोजिनी मंदिरात गेले असताना, सरोजिनीला अचानक अंतरा दिसते. तर, एजेला वाटतंय की लीला त्याचा वाढदिवस विसरली आहे पण, लीला एजेच्या वाढदिवसासाठी ग्रँड सेलिब्रेशन प्लॅन करते.
घरात गोड बातमी आहे ज्यासाठी लीला एक खास पोस्टर बनवते आणि ते पोस्टर एजेला ते उघडण्यास सांगते. त्यामध्ये कुटुंबातील सर्व स्त्रिया एका बाळाची काळजी घेताना दिसत आहेत. या खासप्रसंगी एजे ५१% व्यवसाय भागिदारी लीलाला देण्याची घोषणा करतो. घरात इतकं आनंदाचं वातावरण असताना सर्व कुटुंब मिळून एक खास गाण्यावर डान्स करणार आहेत.
लीला म्हणजेच वल्लरी विराज या गाण्याच्या शूटचा किस्सा सांगताना म्हणाली, “धिक ताना धिक ताना… हे गाणं आम्ही एक तासात शूट केलं. हे गाणं शूट करताना आम्हाला खूप मजा आली. आमच्या मालिकेत सर्वांना नाचायला खूप आवडतं त्यामुळे हे गाणं शूट करणं आमच्यासाठी एक मजेशीर गोष्ट होती. सनी आमचा कोरिओग्राफर त्याने आम्हाला डान्स स्टेप्स दाखवल्या आणि आम्ही पटापट करत गेलो तेही वन-टेक.”
“आम्ही यासाठी थोडाफार सराव केला जेणेकरून टेक करताना चुका कमी व्हाव्यात. एक गमतीचा किस्सा सांगायचा झाला तर, आमचा डान्स सुरु असताना भारती ताई आणि राकेश बापट यांना वाटलं की, सगळे डान्स करत आहेत पण ते दोघे नाहीत. मग भारती ताई, सनीला म्हणाल्या की, आम्हाला का बाजूला उभं केलंय? पहिल्यांदाच आमच्या मालिकेतील संपूर्ण स्टारकास्ट एकत्र डान्स करत होती. प्रत्येक शॉटनंतर आम्हाला फक्त आणि फक्त हसू येत होतं. आम्हा सगळ्यांना प्राण्यांचे मुखवटे दिले होते आणि लहान मुलांची खेळणी सुद्धा आणली होती. आम्ही शूट कट झाल्यावर त्या खेळण्यांनी खेळत होतो.” असं वल्लरी विराजने सांगितलं.