मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार हिंदी मालिकांमध्ये सुद्धा झळकले आहेत. मात्र, दुसऱ्या इंडस्ट्रीत काम करताना या कलाकारांना अनेकदा काही समस्यांचा सामना करावा लागतो. नुकत्याच ‘मराठी मनोरंजनविश्व’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने हिंदी मालिकेच्या सेटवर आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत खलनायिकेची व एजेंच्या मोठ्या सुनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्मिला शिंदे छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे. याआधी सुद्धा तिने ‘पुढचं पाऊल’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. मधल्या काही काळात शर्मिला एका हिंदी मालिकेत काम करत होती. यादरम्यान आलेला अनुभव तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.

शर्मिला शिंदे अनुभव सांगत म्हणाली, “हिंदी मालिकेत काम करताना असा एक प्रसंग आला होता. मी कोणाला दोष देत नाहीये. पण हिंदी मालिकांच्या सेटवर युपी वगैरेचे प्रोडक्शनवाले असतात. त्या सेटवर धुळीची मोठी समस्या होती. त्यातही मालिकेत चाळीतलं घर असल्याने आम्ही सेटवर चपला घालायचो नाहीत आणि तिकडचा स्टुडिओवाला सुद्धा साफसफाई करायचा नाही मग, आम्ही त्या धुळीत बसायचो, चपला न घालता सेटवर वावरायचो. यामुळे पाय खराब होऊ लागले. पायाचे तळवे एकदम कोरडे झाले होते.”

“एक दिवस काय झालं…मी लांब बसले होते, मी काहीच बोलत नव्हते. पण त्या शोमध्ये जी मुख्य भूमिका साकारत होती ती मुलगी त्यादिवशी खूपच त्रासली होती. ती आमच्या प्रोडक्शनवाल्यांना सांगत होती, सर बघा माझे पाय कसे झालेत… म्हणजे ती मुलगी जवळजवळ रडायला आली होती. तेव्हा तो प्रोडक्शनवाला जोरात म्हणाला, ‘यामुळे आपल्या घरातले ज्येष्ठ लोक म्हणतात बायकांनी घरीच राहिलं पाहिजे.’ मी एवढा वेळ शांत बसून होते. पण, जेव्हा त्या माणसाचं ते वाक्य मी ऐकलं तेव्हा, मी लगेच उठले आणि थेट विचारलं, ‘तुम्ही काय म्हणालात आता??” असा सवाल शर्मिलाने त्या प्रोडक्शनच्या सदस्याला विचारला.

अभिनेत्री पुढे म्हणाली, “बायकांनी घरीच राहिलं पाहिजे ना? ठिके, उद्यापासून एकही स्त्री कलाकार सेटवर येणार नाही. तुम्ही सगळे जे प्रोडक्शनवाले आहात ते साड्या नेसा आणि बायकांच्या व्यक्तिरेखांसाठी शूट करा. विग लावा, साड्या नेसा… कारण, तुम्ही बायकांनी बाहेर पडू नये वगैरे असं वक्तव्य करू शकत नाही. आज तुमचं घर चालतंय याला कारण स्त्रियाच आहेत. कारण, टेलिव्हिजन हे बायकांमुळे चालतं. सॉरी मी माझ्या सगळ्या पुरुष सहकलाकारांचा आदर ठेऊन हे बोलतेय.”

“हे खरंय की, टेलिव्हिजन इंडस्ट्री हे महिलाप्रधान माध्यम आहे. हा तिकडून इथे आपल्या महाराष्ट्रात आलेला माणूस आपल्याला कसं सांगू शकतो की, बायकांनी घरी राहिलं पाहिजे वगैरे… त्याला म्हटलं, तुझं जे घर आहे ना ते आमच्यामुळे चालतंय. आम्ही उद्यापासून शूटिंगला नाही आलो ना…तर तुझं घर बंद पडेल. उद्याचा कॉल टाइम पाठवू नकोस आम्ही कोणीच उद्यापासून शूटिंगला येणार नाही आहोत. उद्या तू माझी साडी नेसायची आणि माझे सीन्स करायचे. यानंतर ते प्रकरण खूप मोठं झालं आणि मग मुख्य निर्मात्यांना या गोष्टी समजल्या. ते वक्तव्य करणाऱ्या माणसाला सॉरी म्हणायला लावलं गेलं. हे माझ्याबरोबर पहिल्यांदाच झालं होतं… पण, मराठीच्या कोणत्याही सेटवर असं कधीच होत नाही.” असं शर्मिला शिंदेने यावेळी सांगितलं.