‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlarla) मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. कधी एजे व लीलामध्ये गैरसमज निर्माण होतात. कधी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती या सुना लीलाला घराबाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. अनेकदा एजेसमोर लीला चुकीची ठरावी यासाठी त्या प्रयत्न करताना दिसतात; परंतु एजे अनेकदा तथ्यांवर आधारित निर्णय घेताना दिसतो. अनेकदा त्याने लीलाला तिच्या चुकांसाठी शिक्षादेखील दिली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एजेचे लीलाबद्दलचे मत बदलल्याचे दिसत आहे. अल्लड दिसणारी, गोंधळ घालणारी, वेंधळेपणा करणारी लीला खरे तर प्रगल्भ आहे, याची जाणीव एजेला झाली आहे. आता नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून, एजे लीलाला प्रोत्साहन देताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तू या लूकमध्येसुद्धा किती क्यूट…

झी मराठी या वाहिनीने सोशल मीडियावर ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, एजेने घरी नवीन वर्षाची पार्टी ठेवली आहे. या पार्टीत सर्वांनी सुंदर पोशाखात हजेरी लावली आहे. सर्व जण लीला येण्याची वाट पाहत आहेत. लीला येते तेव्हा तिने केलेला अवतार पाहून सर्व जण तिच्यावर हसतात. तिने साधी साडी नेसली असून, एक घट्ट वेणी बांधली आहे. या वेणीला लाल रिबन बांधली असून, ती वेणी वाकडी दिसत आहे. लक्ष्मी तिला विचारते की, तुम्ही अशा अवतारात का आल्या आहात? सरस्वती म्हणते, ती शेंडी तर? असे म्हणत ती हसते. त्यानंतर लीला रडत तिच्या रूममध्ये जाते. एजेदेखील तिला समजावण्यासाठी जातो. तेव्हा लीला त्याला मिठी मारून रडते. ती रडत रडत त्याला म्हणते, “कशीये मी एजे? धांदरट, सतत गोंधळ घालणारी, बघा ना काय अवतार करून आलीय मी.” पण एजे तिला समजावत म्हणतो, “तू या लूकमध्येसुद्धा किती क्यूट दिसतेस.” त्यानंतर तो तिचा हात हात घेतो आणि तिला पार्टीत घेऊन जातो. त्यानंतर एजेनेदेखील वेगळा लूक केल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे तो लीलासाठी डान्स करताना दिसत आहे. ते पाहून लीलाला आश्चर्य वाटल्याचे तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे; तर एजेचा हा अंदाज पाहून, त्याच्या सुना अवाक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने, “सुनांची फजिती होणार, लीलाचा धांदरटपणा आता एजेंना क्यूट वाटणार…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत या जोडीचे कौतुक केले आहे. “एजे किती सांभाळून घेता लीलाला. एक नंबर एजे”, “एजे-लीला एकदम परफेक्ट”, “आपुन बोला तू मेरी लीला, एजेचा स्वॅग एकदम कडक”, अशा कमेंट्स करीत प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच, अनेकांनी क्यूट म्हणत या जोडीचे कौतुक केले आहे.

आता एजे व लीला यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा सुनांचा प्लॅन फसल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. आता एजे त्याच्या भावना लीलासमोर व्यक्त करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navri mile hitlarla aj will like leelas look daughter in laws plan will fail netizens praised promo nsp