एजे व लीला ही पात्रे प्रेक्षकांना कायमच भुरळ घालताना दिसतात. या दोघांनी कायम एकत्र राहावे, असे प्रेक्षकांना वाटत असल्याचे सोशल मीडियावरील कमेंट्समधून पाहायला मिळते. ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlarla) या मालिकेत पुढे काय होणार याची प्रेक्षकांना सतत उत्सुकता लागल्याचे दिसते. एजे व लीलाची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडत असल्याचे पाहायला मिळते. आता मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
एजे-लीलाचा रोमँटिक अंदाज
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये एजे व लीला एका रोमँटिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दोघेही आनंदात असल्याचे दिसत आहे. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, एजे गुडघ्यावर बसतो. त्याच्या हातात अंगठी आहे. लीलाचा हात हातात घेत एजे म्हणतो, “मेरी दिल की जुबां पर एक ही बात है, आय लव्ह यू लीला.”
‘नवरी मिळे हिटलरला’चा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अबोल भावना अखेर व्यक्त होणार, लीला-एजे यांच्यात गुलाबी प्रेम रंगणार!”, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने, “आता हे स्वप्न नसलं म्हणजे झालं”, असे लिहित त्याचे मत व्यक्त केले आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “आमच्या भावनांशी खेळू नका म्हणजे झालं. उगीच स्वप्न वगैरे दाखवू नका.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “आभास हा, छळतो मला. छळतो सर्वांना.” तर अनेकांनी या जोडीचे कौतुक केले आहे. काही प्रेक्षकांनी मालिकेत पुढे काय होईल, हा व्हिडीओ कुठला असेल याचा अंदाज बांधल्याचे दिसत आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे एजेचे लीलाबरोबरचे हे दुसरे लग्न आहे. आईच्या इच्छेखातर त्याने दुसरे लग्न केले आहे. मात्र, अजूनही त्याचे त्याची पहिली पत्नी अंतरावर प्रेम आहे. लीला मात्र एजेच्या प्रेमात पडली आहे. तसे तिने एजेलादेखील याबद्दल सांगितले आहे. लीलाने तिच्या मनातील भावना एजेसमोर व्यक्त केल्या आहेत. आता प्रेक्षक एजे लीलाच्या प्रेमात कधी पडणार याची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. याबरोबरच लीला सतत रोमँटिक स्वप्ने पाहताना दिसते, त्यामुळे पुन्हा हे लीलाचे स्वप्नच नाही ना, असाही प्रश्न नेटकऱ्यांना पडल्याचे दिसत आहे.
हेही वाचा: अंकिता वालावलकरने तिची आवडती कार का विकली? कारण सांगत ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणाली…
आता एजे खरंच लीलाच्या प्रेमात पडला आहे का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd