काही मालिकांतील पात्रे ही अगदी कमी कालावधीत घराघरांत पोहोचतात. त्यांना मोठी लोकप्रियता मिळताना दिसते. नवरी मिळे हिटलरला (Navri Mile Hitlarla) मालिकेतील एजे व लीला ही पात्रेदेखील अशाच लोकप्रिय पात्रांपैकी आहेत. एजे व लीला हे दोघेही त्यांचे व्यक्तिमत्त्व, वेगळे गुण यांमुळे प्रेक्षकांना आवडतात. त्यांच्यातील मैत्री जितकी भावते, तितकीच त्यांच्यातील कुरबुरी, छोटी छोटी भांडणे पाहतानाही प्रेक्षकांना मजा येते. या मालिकेत एजेची भूमिका अभिनेता राकेश बापटने साकारली असून, लीलाची भूमिका वल्लरी विराजने साकारली आहे. दोघेही अनेकदा सेटवरील फोटो, व्हिडीओ, शूटिंगदरम्यान होणाऱ्या गमती-जमती, रील सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता राकेश बापटने शेअर केलेला एक व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

राकेश बापटने वल्लरी विराजबरोबरचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही बाईकवर बसले असून, गोड हसत असल्याचे दिसत आहे. मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा हा व्हिडीओ असून, अभिनेत्याने अभिला (Abhila) हा हॅशटॅग दिला आहे. त्याबरोबरच नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या इन्स्टाग्राम अकाउंट व सहकलाकार वल्लरी विराजला टॅग केले आहे. या व्हिडीओमध्ये ‘ओ माही’ हे गाणे ऐकायला मिळत आहे.

काय म्हणाले चाहते?

अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करीत प्रेम व्यक्त केल्याचे दिसत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “माझी आवडती जोडी एजे व लीला”, आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “झी मराठीवरील परफेक्ट जोडी.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “विश्वातील बेस्ट जोडी”, असे म्हणत राकेश बापट व वल्लरी विराजला टॅग केले आहे. तर, अनेकांनी मालिकेत हा सीन कधी बघायला मिळणार, एजे व लीलाची लव्ह स्टोरी कधी सुरू होणार, असे प्रश्नही विचारले आहेत. इतर अनेक चाहत्यांनी या जोडीचे कौतुक करणाऱ्या कमेंट्स करीत हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत सध्या लीलाकडे संपूर्ण घराची जबाबदारी आल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या तिन्ही सुना व किशोर या व्यक्ती वगळता इतरांचा तिला पाठिंबा असल्याचे दिसते. घराची जबाबदारी सांभाळताना तिच्याकडून चुकादेखील होताना दिसतात. मात्र, एजे व आजी तिला सांभाळून घेत असल्याचे दिसत आहे. आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये लीला एजेला सरप्राइज देणार असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, ते सरप्राईज पाहून एजेला त्याची पहिली पत्नीची अंतराची आठवण येत असून, तो रागावून मोठ्याने ओरडताना दिसत आहे.

हेही वाचा: ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील लतिका आणि अभिमन्यू पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस; कधी, कुठे जाणून घ्या…

आता एजे लीलाच्या सरप्राईजचा स्वीकार करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader