‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. यातील एजे व लीला ही पात्रे तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत एजे व लीला यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. एजे लीलाच्या प्रेमात पडला आहे. मात्र, त्याला त्याच्या भावना लीलापर्यंत पोहोचवता येत नाहीत. त्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त कराव्यात यासाठी लीला व आजीने एक युक्ती केली होती. मन्या नावाच्या एका मित्राला भेटायला चालल्याचे लीलाने सांगितले होते. मात्र, लीला व आजीसाठी मन्या हे काल्पनिक पात्र होते. पण, एजेने अचानक कॅफेमध्ये जायचे ठरवल्यानंतर लीला एका कॅफेमधील व्यक्तीबरोबर बोलते. आता त्या व्यक्तीने लीलाला घरी फुलेदेखील पाठवल्याचे पाहायला मिळाले होते, त्यावर मन्या असे लिहिले होते. आता हा मन्या नक्की कोण आहे, हे अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टवरून समजत आहे.
काय म्हणाले कलाकार?
अभिनेता अद्वैत कडणे(Advait Kadne)ने त्याच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा त्याचा फोटो मन्या या रूपातील आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्याने ‘नवरी मिळे हिटलरला’च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टॅग केले आहे. हा फोटो शेअर करताना त्याने भेटा ‘मन्याला’ अशी कॅप्शन दिली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांसह यामध्ये कलाकारांचादेखील समावेश आहे.
अभिनेता आशुतोष गोखलेने अद्वैतच्या या पोस्टवर कमेंट करीत हाहाहा असे लिहित हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. अपूर्वा गोरेने हॅलो मनू असे लिहित हार्ट इमोजी शेअर केली आहे. पूजा पुरंदरेने हाय मन्या असे म्हणत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. विजया बाबरने मन्या असे लिहित हार्ट इमोजी शेअर केली आहे. ओंकार राऊतने हॅलो मन्या अशी कमेंट करीत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. आरती मोरेने मला मान्य आहे, अशी मिश्कील कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे.
कलाकार मंडळींबरोबरच अनेक नेटकऱ्यांनीदेखील अद्वैतच्या या नवीन लूकवर कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे. “मन्यामुळे मराठी भाषेचे ज्ञान मिळते, मस्त केले आहे”, “मन्याला ७०चा मॉडेल केलाय. आई-पप्पांच्या लग्नातल्या अल्बममध्ये सगळे असेच दिसायचे. फक्त दाढी पर्यायी होती. एजेंना इर्ष्या वाटेल असं तरी दाखवायंचं”, “मन्या जमलंय, जमलंय, तुम्ही विनोद करा एखादा”, असे म्हणत नेटकऱ्याने हार्ट इमोजी शेअर केली आहे.
मालिकेत अद्वैतने विक्रांतची भूमिका साकारली आहे. लीला, रेवती व त्याच्या पत्नीला त्रास दिल्यानंतर एजेने विक्रांतला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आता काही दिवसांपूर्वी त्याची सुटका करण्यात आली आहे. आता तो मन्याच्या रूपात, वेशभूषा बदलून लीलाच्या आयुष्यात आला आहे. आता तो लीला व एजेमध्ये फूट पाडणार का, वेश बदलून लीला-एजेच्या आयुष्यात येण्याचा त्याचा काय उद्देश असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.