‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlarla) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत लीलाचा मित्र मन्या आला आहे. आजी व लीला या दोघींनी मिळून मन्या नावाचे एक काल्पनिक पात्र निर्माण केले होते, जेणेकरून एजे लीलाप्रतीच्या त्याच्या भावना व्यक्त करेल. मात्र, खरंच लीलाच्या आयुष्यात मन्या नावाची व्यक्ती आल्याचे पाहायला मिळत आहे. आता या मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
एजेची काळजी पाहून लीला झाली भावुक
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये लीलाचा मित्र मन्या तिला तिच्या घराबाहेर भेटायला आल्याचे पाहायला मिळत आहे. हा मन्या लीलाला भेटायला आल्यानंतर लीलाबरोबर एजे व त्याच्या तीन सुनादेखील तिथे उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. मन्याने लीलासाठी एक आईस्क्रीम आणले आहे. मन्याला पाहताच लीला त्याला विचारते की तू एवढ्या रात्री इथे काय करतोयस? त्यानंतर मन्या लीलाला आईस्क्रीम देतो. ते पाहताच एजे लीलाला म्हणतो, लीला तू हे खायचं नाहीये, थंडी आहे. त्यावर मन्या लीलाला, आपल्या मैत्रीसाठी असे म्हणतो. त्यानंतर लीला ते आईस्क्रीम खाताना दिसत आहे व एजे घरात निघून जातो.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, एजे व लीला त्यांच्या खोलीत आहेत. लीला शिंकते. एजे तिला म्हणतो, सांगितलं होतं तुला, आजारी पडलीस ना? लीला त्याला म्हणते, इतकंही काही झालं नाहीये. त्यानंतर एजे तिच्या पायात सॉक्स घालून देतात, हे पाहताच लीलाच्या डोळ्यात पाणी येते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “एजेंच्या रागात दडलेलं प्रेम लीलाला उमगणार…!”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, लीलाने एजेसमोर तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र, एजेने त्याला तिच्याबद्दल काहीही वाटत नसल्याचे स्पष्ट सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच एजेला तो लीलाच्या प्रेमात पडल्याची जाणीव झाली आहे. तो लीलासाठी अनेकविध गोष्टी करताना दिसत आहे, तसेच तिची काळजीदेखील तो घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आता या मन्यामुळे लीला व एजेमधील अंतर कमी होणार की त्यांच्यात पुन्हा दुरावा निर्माण होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.