‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) मालिकेतील लीला आणि एजे ऊर्फ अभिराम या पात्रांनी त्यांच्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. हटके कथानकामुळे ही मालिका लोकप्रिय ठरताना दिसत आहे. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, मालिका नवीन वळण घेणार असल्याचे दिसत आहे.

सासरी परत येताच लीलाने केले एजेकडे दुर्लक्ष

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला लीला तिच्या सासरी परत येते. त्यावेळी तिची सून लक्ष्मी तिला विचारते की, तू कुठल्या हक्काने या घरात परत आली आहेस? एजे म्हणतो की, या घराचे काही नियम आहेत; पण त्यांचे बोलणे सुरू असताना ती वरच्या मजल्यावर जाऊ लागते. एजे म्हणतो, “मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय.” लीला म्हणते, “मला तर वाटलं होतं. तुम्ही माझ्याशी परत कधीच बोलणार नाही. विचार बदलला की काय?” त्यानंतर पाहायला मिळते की, लीलाच्या तिन्ही सुना दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती घरात काम करताना दिसत आहेत. लीला म्हणते, “मी यांच्यापेक्षा वयानं लहान असल्यानं आमच्यातील नातं या विसरल्या आहेत. मी आता आली आहे ना, आता तुम्ही ते कधीच विसरणार नाही.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने, “लीला घरी परत येणार, सूनांना सासू त्यांची कर्तव्य शिकवणार…”, अशी कॅप्शन दिली आहे.

झी मराठी इन्स्टाग्राम

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, लीला अंतराची जागा घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असा एजेचा गैरसमज होतो. त्यामुळे तिला तो घरातून बाहेर काढतो. लीला काही दिवस माहेरी राहते. एजेची आई लीलाच्या घरी येते. तिला एजे आणि अंतराची गोष्ट सांगते. “अंतरा असताना एजेसुद्धा आनंदी राहायचा; मात्र ती गेल्यानंतर तो जगणं विसरला आहे”, असे ती लीलाला सांगते. त्यानंतर लीला आजीजवळ सासरी परत येण्याचे मान्य करते. त्याबरोबरच आता परत आल्यानंतर त्या तीन सुनांची सासू म्हणून येईन आणि एजेला पूर्वीसारखं जगायला शिकवेन, असे लीला म्हणते.

हेही वाचा: Bigg Boss 18: ‘टाइम गॉड’ होताच विवियन डिसेनाचं बदललं रुप, श्रुतिका अर्जुनशी झाले वाद

आता मालिकेत पुढे काय होणार, लीलाच्या बदलेल्या रूपावर काय असेल सुनांची प्रतिक्रिया, एजे आणि लीला यांच्यातील दुरावा कमी होणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.