मालिकांचे प्रोमो प्रेक्षकांची उत्कंठा वाढवताना दिसतात. आपल्याला आवडत असलेल्या मालिकेत पुढे काय होईल, कथानक कोणते नवीन वळण येईल, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असते. आता लोकप्रिय मालिका नवरी मिळे हिटलरला (Navri Mile Hitlarla) मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे लीलाच्या आयुष्यात पुढे काय होणार, याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.
लीलाला सासरी पुन्हा स्थान मिळणार का?
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला, लीला व एजे कारमधून जात आहेत. त्यावेळी आजीचा लीलाला फोन येतो. आजी लीला सांगते, “प्रमोद व विराजच्या पाठीशी उभी राहिलीस, त्यांनी तुझ्यासाठी पुन्हा वोटिंग घ्यायचं ठरवलं आहे.” लीला एजेला म्हणते, “का तुम्ही या सगळ्यातून जायला लावताय? आणि आज असं वेगळं काय होणार आहे? आजी मला वोट करतील. कदाचित प्रमोदसर आणि विराजसर मला वोट करतील. पण, लक्ष्मी, सरस्वती व किशोरसर दुर्गालाच वोट करणार आणि मग सगळा प्रश्न तुमच्या मतावर येऊन थांबणार. तुम्ही त्या दिवशी कोणाला मत दिलं होतं हेही मला माहीत नाही.” हे ती बोलत असताना जहागीरदार कुटुंबातले सदस्य वोटिंग करताना दिसत आहेत.
नवरी मिळे हिटलरला मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “एजेंनी कुणाला वोट दिलं, हे कळेल का लीलाला…?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांनी लीला जहागीरदार कुटुंबात नको आहे. त्यामुळे ते तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. या सगळ्यात दुर्गाला यश मिळाल्याचे काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले होते. दुर्गाने सर्वांसमोर अट ठेवली होती की, एक तर ती किंवा लीला दोघींपैकी एकच त्या घरात राहू शकेल. त्यासाठी तिने घरातील लोकांचे वोटिंग घेतले होते. सर्वांत जास्त मते दुर्गाला मिळाली होती. लीलाने तिच्या सासरच्या घरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. ती घरातून बाहेर गेल्यानंतर दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांना जिंकल्यासारखे वाटले होते.
परंतु, आता समोर आलेल्या प्रोमोमधून बाजी पलटणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लीलाच्या आयुष्यात काय बदल होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.