मालिकेत दिसणारे कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. महत्त्वाचे म्हणजे चाहत्यांचादेखील सोशल मीडियावरील कलाकारांच्या व्हिडीओ, रील्सना मोठा प्रतिसाद मिळतो. आता ‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla)मधील कलाकार एका डान्स व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लक्ष्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सानिका काशिकर व प्रमोदची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद नंदा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
ऑनस्क्रीन जोडीचा डान्स
अभिनेत्री सानिका काशिकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये सहकलाकार मिलिंद नंदाबरोबर डान्स करताना दिसत आहे. दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. ‘रफ्ता रफ्ता’ या गाण्यावर त्यांनी ठेका धरला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने ‘संक्रांत स्पेशल’ असे लिहिले आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स करीत त्यांचे कौतुक केले आहे. ‘वाह’, ‘खूपच छान’, ‘जमतंय बग दादा’, ‘सुंदर’, ‘छान’, अशा अनेक कमेंट्स दिसत आहेत. तसेच सहकलाकार राजदीपनेदेखील इमोजी शेअर करीत कौतुक केले आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये सानिका व मिलिंद यांनी लक्ष्मी व प्रमोद ही पात्रे साकारली आहेत. ऑनस्क्रीन नवरा-बायकोची ही जोडी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसते. आता या ऑनस्क्रीन जोडीचा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याचे दिसते आहे.
नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एजे व लीला ही मुख्य पात्रे आहेत. एजेला तीन मुले आहेत. किशोर, विराज व प्रमोद ही तीन मुले, त्यांच्या पत्नी व आजी, असे एजेचे कुटुंब आहे. दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती या सुना आहेत. एजेचे आधी अंतराबरोबर लग्न झाले होते. आता त्याचे लीलाबरोबर लग्न झाले आहे. दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांना लीला सासू म्हणून आवडत नाही. लीला त्या घराला जबाबदारीने सांभाळू शकत नाही, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे एजेने लीलाला घराबाहेर काढावे, यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करीत असतात. मात्र, आता एजे लीलाच्या प्रेमात पडला आहे. तो तिच्यासाठी अनेक गोष्टी करताना दिसतो. तिला स्पेशल वाटावे यासाठी अनेकविध गोष्टी तो करीत असल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. आता पुढे या लोकप्रिय मालिकेत काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.