काही मालिकांतील पात्रे प्रेक्षकांची अत्यंत लाडकी असतात. त्यांच्यात होणारे वाद-विवाद, कुरबुरी, भांडणे यांचा प्रेक्षकांवरदेखील परिणाम होताना दिसतो. ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlarla) या मालिकेतील एजे व लीला ही पात्रेदेखील प्रेक्षकांची लाडकी असल्याचे पाहायला मिळते. एजे व लीला यांच्यातील नाते सध्या फुलत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, या सगळ्यात त्यांच्यात कोणीतरी फूट पाडण्याचा, दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

भांडण झालं असेल….

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, एजे व लीला बाहेरून घरात येतात. ते एकत्र घरात येतात; मात्र ते एकमेकांशी बोलत नाहीत. त्यांना पाहून सरस्वती लक्ष्मीला म्हणते, “वहिनी, हे दोघं काहीच का बोलत नाहीयेत? भांडण झालं असेल का यांच्यात?” एजे त्याच्या रूमकडे जायला निघतो. तितक्यात त्यांच्या घरात काम करणारी एक महिला कर्मचारी लीलाकडे येते आणि तिला म्हणते की, लीलामॅडम तुमच्यासाठी कोणीतरी फुलं पाठवली आहेत. लीला ती फुलं हातात घेते. एजे ते पाहतो आणि परत येतो. आजी फुलं पाहून म्हणतात की, अरे वाह, कोणी पाठवला बुके? एजे त्यावरील कार्ड वाचून दाखवतो. त्यावर लिहिलेले असते, “मन्या, तुझा हितचिंतक.” लीला मनातल्या मनात विचार करीत स्वत:शीच म्हणते, “मन्या? पण, असं तर कोणी नाहीच. तर ही फुलं कोणी पाठवली असतील?” सरस्वती म्हणते की, ते म्हणतात ना दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. एजे लीलाच्या हातात पुन्हा तो फुलांचा बुके देतो आणि म्हणतो, “छान, चांगला कॉर्नर शोधून ठेवून दे तिथे” आणि एजे निघून जातो. लीला मात्र विचारात पडते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘हा अनोळखी मन्या लीला आणि एजेच्या नात्यात पाडेल का फूट?’, अशी कॅप्शन दिली आहे.

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांची मते व्यक्त केली आहेत. “झाली संसाराला सुरुवात”, “प्लीज हा विक्रांतचा ट्विस्ट लवकर संपवा. लीला व एजेमध्ये आताच चांगली सुरुवात झाली आहे. एजे-लीलामध्ये आता दुरावा नको. एजेने लीलाला लवकर प्रपोज करू दे”, “ट्विस्ट छान आहेत; पण लवकरात लवकर संपवा. ईर्षा क्यूट वाटते; पण खलनायकाला मधेच आणून ट्रॅक खराब नका करू” अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी त्यांची मते व्यक्त केली आहेत.

हेही वाचा : ‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर

नवरी मिळे हिटलरला या मालिकेत दाखविल्याप्रमाणे एजेला तो लीलाच्या प्रेमात पडल्याची जाणीव झाली आहे. तो तिच्यासाठी काही स्पेशल गोष्टी करीत असल्याचे दिसत आहे. मात्र, त्याने त्याच्या भावना लीलासमोर उघड केल्या नाहीत. त्याला ईर्षा वाटावी म्हणून एजेला ती तिच्या मित्राला मन्याला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगते. हा आजीचा व लीलाचा प्लॅन आहे. ती एका कॅफेमध्ये जाते. एजेदेखील तिच्याबरोबर येतो. त्याला दाखविण्यासाठी ती एका अनोळखी व्यक्तीबरोबर गप्पा मारते. आता मात्र या मन्या नावाच्या व्यक्तीने लीलासाठी फुले पाठविली आहेत. या मन्यामुळे लीला व एजे यांच्या पुन्हा दुरावा येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader