परेश मोकाक्षी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव यांच्या पात्रांभोवती फिरणारी कथा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळे सध्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा चांगला बोलबोला सुरू आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव व्यतिरिक्त अभिनेता सारंग साठ्ये, बालकलाकार मायरा वायकुळ, अभिनेत्री सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे असे बरेच कलाकार झळकले आहेत.
‘नाच गं घुमा’ चित्रपटातील गाणी ट्रेंड होतं आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाच्या शीर्षकगीताने अक्षरशः सर्वांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर ‘नाच गं घुमा’ गाण्यावर प्रत्येक जण व्हिडीओ करत आहे. अशातच ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील एजे-लीलाने देखील ‘नाच गं घुमा’ गाण्यावर ठेका धरला आहे. सोबतीला निर्माते देखील पाहायला मिळत आहेत.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढताना दिसत आहे. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील एजे (अभिराम जहागीरदार) व लीलाच्या जोडीला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळताना दिसत आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेची निर्माती, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने नुकताच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘नाच गं घुमा’ गाण्यावर एजे (राकेश बापट), लीला (वल्लरी विराज), शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा – Video: रात्रीची झोप उडवायला येतेय झीची नवीन भयावह मालिका, जबरदस्त प्रोमो आला समोर
दरम्यान, ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून शर्मिष्ठा राऊतने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिच्या सोबतीला पती तेजस देसाई देखील आहे. याशिवाय ‘नाच गं घुमा’ चित्रपटात शर्मिष्ठा एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे.
‘नाच गं घुमा’ चित्रपट १ मेला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २.१५ कोटींचा गल्ला जमवला. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडी घट झाली. दुसऱ्या दिवशी ‘नाच गं घुमा’ने ८० लाख तर तिसऱ्या दिवशी ९५ लाखांची कमाई केली. त्यानंतर वीकेंड असल्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायात वाढ झाली. सॅकनिक्लने दिलेल्या रिपोर्टनुसार, प्रदर्शित झाल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यात ‘नाच गं घुमा’ चित्रपटाने एकूण ११.१५ कोटींची कमाई केली आहे.