Navari Mile Hitlerla : ‘झी मराठी’च्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत सध्या लीला अभिरामच्या वाढदिवसासाठी खास प्लॅनिंग करत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. लीला यावेळीही एजेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मोठा घोळ घालते. केक घेऊन येताना लीलाचा तोल जातो आणि एजेच्या तोंडाला केक लागतो. आता एजे आपल्याला पुन्हा ओरडणार हे तिला माहिती असतं पण, एजे बायकोला प्रेमाने जवळ घेऊन ‘आता मी आधीसारखा नाहीये’ असं सांगतो.
लीला आणि एजेचा संसार आता हळुहळू फुलत चालला आहे. दोघांनीही काश्मीरला जाऊन एकमेकांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. याशिवाय एजेने बायकोला तिचं करिअर घडवण्यासाठीही परवानगी दिलेली असते. सगळं काही सुरळीत होत असताना आता अचानक मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आता लवकरच एजेची पहिली पत्नी अंतराची एन्ट्री होणार आहे. अंतराचं काही वर्षांपूर्वीच निधन झालेलं असतं असं मालिकेत दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे अंतराला पुन्हा आलेलं पाहून सर्वांच्या मनात धडकी भरणार आहे. सर्वात आधी एजेची आई सरोजिनी अंतराला देवळात पाहते. यानंतर अंतरा एक दिवस नक्की घरी येणार हे सरोजिनीला माहिती असतं आणि तिची हिच भीती खरी ठरते.
अचानक जहागीदारांच्या दरवाजावर येऊन अंतरा उभी राहते. लीला दार उघडून जेव्हा अंतराला समोर पाहते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. सरोजिनी सुद्धा स्तब्ध होते. आता अंतराने एन्ट्री घेतल्यावर एजे-लीलाच्या नात्यावर याचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मालिकेत हा मोठा ट्विस्ट आलेला असताना नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये ही अंतरा एजेची खरी बायको नसून, एजे-लीलाच्या संसारात वाद निर्माण करण्यासाठी किशोर जहागीरदारने खेळलेली ही नवीन खेळी आहे असा अंदाज व्यक्त केला आहे. आता ही अंतरा खरी आहे की खोटी? पहिल्या बायकोला पाहिल्यावर एजे काय निर्णय घेणार? या सगळ्या गोष्टी मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका नव्या वेळेनुसार रोज रात्री ११ वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये लीलाची भूमिका अभिनेत्री वल्लरी विराज तर, एजेच्या भूमिकेत अभिनेता राकेश बापट झळकत आहे.