सध्या झी मराठी वाहिनीवर मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे. त्यामध्ये ‘पारू'(Paaru), ‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlerla), ‘लक्ष्मी निवास’, ‘लाखात एक आमचा दादा’, ‘शिवा’, ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकांचा समावेश आहे. नायिका विरुद्ध खलनायिका अशा स्वरूपाची थीम या महासंगममध्ये पाहायला मिळत आहे. होळीच्या निमित्ताने हे कलाकार एकत्र आले आहेत. मालिकेशिवाय या कलाकारांच्या डान्सचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. आता या सगळ्यात ‘नवरी मिळे हिटलरला’मधील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

‘नवरी मिळे हिटलरला’फेम अभिनेत्री भूमिजा पाटीलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टच्या सुरुवातीच्या काही फोटोंमध्ये अभिनेत्री पूर्वा शिंदे दिसत आहे. पुढे काही ग्रुप फोटो दिसत आहेत, ज्यामध्ये लक्ष्मी निवास, सावळ्याची जणू सावली, शिवा मालिकेतील अभिनेत्री दिसत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. काही फोटोंमध्ये अभिनेत्रींच्या हाताला रंग असल्याचेदेखील दिसत आहे. हे फोटो शेअर करताना भूमिजाने पूर्वा शिंदे, झी मराठी वाहिनी, ‘नवरी मिळे हिटलरला’च्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग केले आहे.

फोटो शेअर करताना अभिनेत्रीने, “जेव्हा दोन खलनायिका भेटतात”, असे लिहिले आणि पुढे हार्ट इमोजी शेअर केली. तिच्या या पोस्टवर पूर्वा शिंदेने कमेंट करीत, “आय लव्ह यू क्यूटी”, अशी कमेंट केली आहे. चाहत्यांनीदेखील कौतुक केल्याचे कमेंट्समध्ये दिसत आहे. नेटकऱ्यांनी छान, मस्त असे लिहीत अभिनेत्रींचे कौतुक केले आहे.

अभिनेत्री भूमिजा पाटीलने नवरी मिळे हिटलरला या मालिकेत सरस्वती ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेतून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. मालिकेतील तिची भूमिका खलनायिकेची जरी असली तरी ही भूमिका विनोदीदेखील आहे. त्यामुळे ‘नवरी मिळे हिटलरला’मधील सरस्वती प्रेक्षकांची लाडकी आहे. पूर्वा शिंदेबद्दल बोलायचे, तर अभिनेत्री पारू या लोकप्रिय मालिकेत ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. दिशा असे तिच्या पात्राचे नाव आहे. किर्लोस्कर कुटुंबाला त्रास देणारी, पारूबरोबर नेहमीच भांडत असणारी दिशा तिच्या खलनायिकेची छाप पाडते. या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या असल्याचे दिसते. मालिकेत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवतात. त्यामुळे या मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याचे दिसते.