‘दार उघडं बये…दार उघडं’ म्हणतं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाने १३ सप्टेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतला. तब्बल २० वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर यांना नवी ओळख मिळाली. शिवाय संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना यानिमित्ताने आदेश भाऊजी भेटले.

‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा शेवट होताना ‘झी मराठी’ वाहिनीने ‘उत्सव बाप्पाचा खेळ होम मिनिस्टरचा’ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात ‘झी मराठी’च्या मालिकेतील नायिका ‘होम मिनिस्टर’चा खेळ खेळताना पाहायला मिळाल्या. यामध्ये ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीने बाजी मारली. तिला सव्वा लाखाची पैठणी मिळाली. याचा अनुभव तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील सरस्वती म्हणजे अभिनेत्री भुमिजा पाटील हिने सव्वा लाखाची पैठणी जिंकली. याचा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं की, होय, ती सव्वा लाखाची पैठणी मला मिळाली. लहानपणापासून माझी इच्छा होती की कधीतरी ‘होम मिनिस्टर’मध्ये जावं. मग मलाही आदेश भाऊजींच्या हस्ते पैठणी साडी मिळेल. Manifest करणं म्हणतात ते हेच असावं. जेव्हा मी पैठणीचा खेळ खेळले तेव्हा अजिबात असं डोक्यात नव्हतं की आपण जिंकावं. मला ‘होम मिनिस्टर’मध्ये भाग घेता आलं त्यातच मी खुश होते. पण माझे सहकलाकार म्हणजेच ‘नवरी मिळे हिटलरला’ ही टीम माझ्याबरोबर होती. मला चिअर करत होती. त्यांनी मला विश्वास दिला की, ही पैठणी तुझीच आहे आणि ही पैठणी तुलाच मिळणार आणि ते खरं झालं ती ‘सव्वा लाखाची पैठणी’ माझी झाली. ही संधी मला ‘झी मराठी’मुळे मिळाली.

हेही वाचा – Video: “जाहीर झालं जगाला…”, ‘येक नंबर’ चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषालच्या आवाजातील प्रेमगीत प्रदर्शित, पाहा…

हेही वाचा – घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अभिषेक बच्चनने ‘जलसा’च्या शेजारी घेतली मालमत्ता, दोन महिन्यांपूर्वी खरेदी केले होते फ्लॅट्स

दरम्यान, भुमिजा पाटीलच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री वल्लजी विराज, समृद्धी केळकर, ऐश्वर्या शेटे, मधुरा जोशी, सायंकीत कामत अशा अनेक कलाकारांनी भुमिजाचं कौतुक केलं आहे.