‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) या मालिकेतील अनेक कलाकार त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतात. वल्लरी विराज व राकेश बापट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकार काम करत आहे. अभिनेता प्रसाद लिमयेने या मालिकेत किशोर ही भूमिका साकारली आहे. किशोर ही भूमिका नकारात्मक असल्याचे दिसते. एजे व लीला यांच्यात दुरावा यावा, एजे उद्ध्वस्त व्हावा यासाठी किशोर सतत प्रयत्न करताना दिसतो. आता मात्र अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याने एक व्हिडीओ शेअर करीत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाबा तुम्हाला जाऊन बारा वर्षे झाली…

प्रसाद लिमयेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एका बाईकबरोबर दिसत आहे. बाईक स्वच्छ पुसत ती प्रसादने चालवल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने त्याच्या वडिलांना उद्देशून भावना व्यक्त केल्या आहेत. प्रसादने लिहिले, “मी असं कधी व्यक्त झालो नाही, पण आज राहवलं नाही. बाबा तुम्हाला जाऊन बारा वर्षे झाली, म्हणजे जवळ जवळ एक तप पूर्ण झालं. तुम्ही मला सगळ्या गोष्टी शिकवल्या. कसं वागायचं, कसं बोलायचं, आयुष्यात कितीही संकटं आली तरी कसं तोंड द्यायचं. बाबा, फक्त एकच गोष्ट शिकवली नाहीत की तुम्ही नसताना, आई नसताना एकट्याने जगायचं कसं? आणि आता मला ते कधी शिकायचंही नाहीये. कारण तुम्ही नसलात तरी तुमच्या आठवणी, तुम्ही केलेले संस्कार हे तुमच्या जपून ठेवलेल्या सगळ्या वस्तू मला सतत जाणवून देत असतात, तुमच्या शब्दांची आठवण करून देत असतात की, मी आहे काळजी करू नकोस.”

“पुण्याला गेलो की या बाईकशी सगळं बोलतो, प्रत्येक वेळी तिला सगळं सांगतो. सगळे जुने दिवस आठवतात, सगळं झरकन डोळ्यासमोर येऊन जातं. हीच गाडी माझ्याकडे लायसन्स नसताना अजिबात चालवायची नाही असं तुम्ही ओरडायचा. आज सगळं आहे, पण हे सगळं बघायला बाबा तुम्ही नाही आहात. तुमची ‘ही’ आठवण जीवापलीकडे जपतो, कारण आता माझ्यासाठी आपली भेट इथेच होते. रोज क्षणाक्षणाला तुमची, आईची आठवण येते. दिवस येतो, जातो पण; तुमच्या जागी असलेलं रितेपण काही केल्या भरून निघणं अशक्यच.”

दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसत आहेत. लीला व एजे यांच्यातील लव्हस्टोरी प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार; दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती पुढे काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.