Sanika Kashikar shares Video With Co Actress: ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार, असे म्हटले जात आहे. आता या मालिकेत लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणाऱ्या सानिका काशिकरने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील लीलाच्या भूमिकेत दिसणाऱ्या वल्लरी विराजने सहअभिनेत्री आलापिनीला उद्देशून तुझी खूप आठवण येईल, असे लिहिले होते. त्याबरोबरच आलापिनी तिच्यासाठी ज्या गोष्टी प्रेमाने करते, त्याबद्दलही तिने लिहिल्याचे तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पाहायला मिळाले. आता या मालिकेतील सर्व अभिनेत्रींचा डान्सचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

अभिनेत्री सानिका काशिकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘मैं कोई ऐसा गीत गाऊँ’ या गाण्यावर मालिकेतील अभिनेत्री डान्स करताना दिसत आहेत. त्यामध्ये या मालिकेतील सरोजिनी आजी, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, रेवती, लीला, अंतरा या सगळ्या अभिनेत्रींचा समावेश आहे. त्यांच्या डान्समध्ये अभिनेत्रींमधील बॉण्डिंगदेखील दिसत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना सानिकाने लिहिले की, शेवटचं एकदा जहागीरदारांच्या मुली एकत्र डान्स करीत आहेत. हा व्हिडीओ खास आहे, अशा आशयाची कॅप्शन त्याला दिली आहे. हा व्हिडीओ आणि त्याला अभिनेत्रीने दिलेली कॅप्शन पाहून अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांना मालिका संपत असल्याने वाईट वाटत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नेटकरी काय म्हणाले?

सानिका काशिकरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “लास्ट टाइम? असं का म्हणताय? अजून निरोप घ्यायची वेळ झाली नाही”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “कृपया मला रडवू नका. मला तुमची खूप आठवण येईल”. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “कृपया, लास्ट टाइम असं नका म्हणू”. तर एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही मला रडवलं.”

“तुम्हा सगळ्यांना पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. तुम्ही सगळ्या मुली खूप छान आहात”, “आम्हाला तुमची खूप आठवण येईल. तुम्ही कल्पना करू शकत नाही इतकं आम्ही तुमच्यावर प्रेम करतो”, “या मालिकेची खूप आठवण येईल”, “नवरी मिळे हिटलरला मालिकेतील अभिनेत्रींवर खूप प्रेम आहे”, “तुम्ही सगळ्या उत्तम आहात. तुमच्या पुढच्या प्रोजेक्टमध्येदेखील आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. बेस्ट टीम आणि बेस्ट शो आहे.”

चाहत्यांबरोबरच मालिकेत दुर्गाच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री शर्मिला शिंदेने दु:खी असल्याची इमोजी शेअर केली. तर सरोजिनी या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री भारती पाटील यांनी लिहिले, “सुंदर मुलींनो. ही रील कायम माझ्या हृदयात राहील.”

दरम्यान, मालिकेत सध्या अंतराच्या येण्याने लीला व एजेच्या आयुष्यात वादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.