‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlerla) ही मालिका विविध ट्विस्ट आणत प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असते. त्यामध्ये कधी लीला व दुर्गा यांच्यामधील भांडणे पाहायला मिळतात; तर कधी लीला व एजेमधील केमिस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. आजी लीलाला आईची माया लावत तिला वेळोवेळी मार्गदर्शन करीत, प्रसंगी रागावून लीलाला मदत करीत सर्वांची मने जिंकत असते. सरू व लक्ष्मी कट-कारस्थान करीत असतात. मात्र, सरूच्या चुकलेल्या म्हणी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करीत असतात. लीलाची बहीण रेवती व दुर्गाचा भाऊ यश हे दोघेही सर्वांना चांगल्या मनाने मदत करीत असतात. मालिकेबरोबरच हे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.
नवरी मिळे हिटलरला या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराजने प्रमुख भूमिका साकारली आहे. तिचे लीला हे पात्र लोकप्रिय ठरले आहे. वल्लरी विराज अनेकदा सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ शेअर करीत असते. आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘आताच बया का बावरलं’ या गाण्यातील कडव्यावर अभिनेत्रीने डान्स केला आहे. त्यामधील तिचे हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. विशेष बाब म्हणजे तिने या गाण्यावर बसून डान्स केला आहे. तिचे हातवारे व चेहऱ्यावरील हावभाव सर्वांना पसंतीस पडत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना वल्लरी विराजने लाज गाली आली, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
वल्लरी विराजने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करीत अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. तसेच काही कलाकारांनीदेखील वल्लरी विराजचे कौतुक केले आहे. मालिकेत रेवतीच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री आलापीनीने, “एकदा बघाल, तर बघतच राहाल”, अशी कमेंट केली आहे. तर, आशुतोष गोखलेने हार्ट इमोजी शेअर केली आहे. चाहत्यांनी कौतुक करीत लिहिले, “तुझ्या चेहऱ्यावरील हावभावांची चमक तुझ्या डोळ्यांत दिसते. “तुझ्या हातांच्या हालचाली लक्ष वेधून घेतात”, “खूप सुंदर दिसत आहेस आणि हावभावही खूप सुंदर आहेत”, “खूप सुंदर हावभाव”, “हातवारे इतके सफाईदार अन् सुंदर आहेत की, नजर ठरत नाहीये. खरी कलाकार. तुझ्यासारखाच तुझा ड्रेसही सुंदर आहे”, “सुंदर”, “अप्रतिम”, “क्यूट”, “तुझ्या पुढच्या व्हिडीओची वाट बघत आहे”, “कसं जमतं इतकं गोड”, “अगं, किती गोड, मस्तच”, अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहे.
दरम्यान, नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अंतरा म्हणजेच एजेची पहिली पत्नी परत आल्याचे पाहायला मिळत आहे. आता अंतराच्या येण्याने मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.