‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlerla) या मालिकेतून अभिनेत्री वल्लरी विराज(Vallari Viraj) घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेतून अभिनेत्रीला मोठी प्रसिद्धी मिळाली. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ही मालिका मोठी लोकप्रिय ठरलेली दिसते. आता या मालिकेत वल्लरी विराजने लीला ही भूमिका साकारत सर्वांची मने जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरील अभिनेत्रीच्या फोटो, व्हिडीओंना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिचा फिटनेस मंत्रा काय आहे, ती गोड खाते का आणि किती व कधी खाते, यावर तिने वक्तव्य केले आहे.
वल्लरी विराजने काही दिवसांपूर्वी ‘टेली गप्पा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिचा फिटनेस मंत्रा विचारला, त्यावर तिने म्हटले, “एक काळ होता, कॉलेजमध्ये जेव्हा मी सतत वजनाच्या काट्यावर उभी राहायचे. तेव्हा मला असं वाटायचं की बापरे इतकं वजन वाढलंय वैगेरे. त्यानंतर लॉकडाऊनपासून माझ्या लक्षात आलं की वजन काट्यावर दिसतंय हे महत्वाचं नाही. तुम्ही किती अॅक्टीव्ह आहात, तुम्ही दिवसभरात काय करताय? तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला छान वाटतंय का? तुम्हाला हवे तसे कपडे घालून तुम्हाला ड्रेसअप होता येतंय का, हे महत्वाचं आहे. त्यामुळे वजनाच्या काटावर उभं राहणं मी अगदीच बंद केलं. मी बरोबर गोष्टी खातेय का, यावर मी लक्ष देते. वजनामागे धावू नका, तुम्ही चांगल्या गोष्टी खा, व्यायाम करा, हालचाल करा, आरोग्यदायी जीवनपद्धतीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे.”
वल्लरीला विचारण्यात आले की तीचं रूटिन कसं असतं? नाश्ता, जेवणात कोणत्या पदार्थाचा समावेश असतो? असे विचारले. यावर बोलताना वल्लरीने म्हटले, “मी जर नाश्त्यामध्ये थालीपीठ बनवलं. माझ्याबरोबर आलापीनी राहते. तर आम्ही दोघी एकत्र मिळून काम करतो. रात्री आम्ही बऱ्याचदा कडधान्ये खातो. नाश्त्यामध्ये पोहे, उपमा यामधील एक गोष्ट किंवा अंडी, ऑम्लेट, कॉफी आणि फळ हा आमचा नाश्ता असतो. फळाशिवाय आम्ही नाश्ता करतच नाही. आम्ही सवयच करून घेतली आहे. नाहीतर फळ खाल्लच जात नाही. त्याच्यानंतर सेटवर भाजी बनवून आणतो. त्याबरोबर गाजर-काकडी कापून आणतो. सेटवरील केटरिंगच्या दादांना मी भाकरी सांगते. तर ते मला भाकरी देतात. त्याबरोबर दही असं माझं दुपारचं जेवण असतं. सात वाजता मी जेवते. त्यानंतर मी काही खात नाही. जे काही बनवलं असेल आणते.
आठवड्यातून तीन वेळा…
व्यायामाविषयी बोलताना वल्लरीने म्हटले, “माझा प्रयत्न असतो की आठवड्यातून तीन वेळा मी व्यायाम करावा. त्यापेक्षा जास्त व्यायाम करणं मला शक्यच होत नाही. कारण- झोप व व्यायाम यामध्ये निवडायचं असेल तर मी झोपेला निवडते. मला मायग्रेचा त्रास असल्याने जर झोप पूर्ण झाली नाही तर माझा दिवस फारच वाईट जातो. त्यामुळे माझा प्रयत्न असतो की सात तास झोप व्हायलाच आहे.”
“डाएटचं म्हटलं तसं मी डाएटच्याच गोष्टी खाते. मी गोड खातच नाही. म्हणजे मी ३१ डिसेंबरच्या पार्टीला मी गोड खाल्लं आहे. तर त्यानंतर मी गोड खाल्लेलच नाहीये. तर मी असं मी ठरवून करते. कारण मी रोज व्यायाम करत असते तर गोष्ट वेगळी होती. पण मी करत नाही. मला वाटतं मी मार्चच्या शेवटी गोड खाईन. त्यानंतर जुलैला माझा वाढदिवस आहे. २० जुलैला वाढदिवस असतो, तर १ जुलै ते २० जुलै गोड खायचं. त्यानंतर मी गणपतीत पहिल्या दिवशी गोड खाईन. त्यानंतर दिवाळीचे तीन दिवस खाईन. त्यानंतर नवीन वर्ष येईलच”, असे म्हणत वल्लरीने फार कमी प्रमाणात गोड खात असल्याचे सांगितले.
दरम्यान, आता नवरी मिळे हिटलरला मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.