गोंधळ घालणारी, प्रेमळ, वेंधळी, समजूतदार, प्रसंगी धाडसी, कुटुंबासाठी धडपड करणारी लीला सर्वांची लाडकी आहे. ‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlerla)मधील लीला तिच्या गोड स्वभावाने सर्वांचे मन जिंकते. तिने खडूस असणार्या एजेलादेखील तिच्या स्वभावाने बदलले आहे. कडक शिस्तीचा, सर्वांशी खडूसपणे वागणारा, कधीही न हसणारा एजे लीलाच्या आयुष्यात येण्याने बदलला आहे. त्यामुळे ही एजे-लीलाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसते. या मालिकेत लीलाच्या भूमिकेतली अभिनेत्री वल्लरी विराज(Vallari Viraj) प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. मालिकेबरोबरच वल्लरी विराज सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसते.
आता वल्लरी विराजने सोशल मीडियावर मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सेटवर गमती-जमती करताना दिसत आहे. कधी हातातील फुलांच्या पाकळ्या फेकताना दिसत आहे; तर कधी ती हसताना दिसत आहे. ती या व्हिडीओमध्ये श्वानाबरोबर खेळतानाही दिसत आहे. त्यामध्ये काही ठिकाणी तिचा सहकलाकार अभिनेता राकेश बापटही दिसत आहे. या व्हिडीओवर दिवसातील शेवटचा सीन, असे लिहिले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना वल्लरी विराजने लिहिले, “कोण म्हणतं की, अभिनय करणं हे गंभीर काम आहे.”
वल्लरी विराजने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करीत तिचे कौतुक केले आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील सरस्वतीने म्हणजेच अभिनेत्री भूमिजा पाटीने क्यूटी असे लिहीत तिचे कौतुक केले. तर ‘शिवा’फेम पूर्वा कौशिकने क्यूट वल्लू, असे लिहीत तिचे कौतुक केले आहे. अनेक चाहत्यांनीही हार्ट इमोजी शेअर करीत कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, मालिकेत आता लीला व एजे यांच्यातील प्रेम पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अंतराची म्हणजेच एजेच्या पहिल्या पत्नीची एन्ट्री झाल्याचे दिसत आहे. तिला पाहिल्यानंतर एजे व लीला दोघांच्याही चेहऱ्यावर धक्का बसल्याचे दिसत आहे. तर, एजेबरोबर एका मुलीला पाहिल्यानंतर अंतराच्या चेहऱ्यावरही धक्का बसल्याचे भाव दिसत आहेत. त्यामुळे आता मालिकेत काय वळण येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.