‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlerla) ही मालिका काही दिवसांपासून चर्चेत आहे. मालिकेतील एजे व लीला काश्मीरला गेल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. लीलाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एजे तिला सरप्राइज देत काश्मीरला घेऊन गेला आहे. विशेष बाब म्हणजे एजेने तिला काश्मीरमध्ये फिल्मी स्टाईलने प्रपोज केले आहे. त्याबरोबरच तो अंतरानंतर लीलाच्या पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचेदेखील एजेने कबूल केले आहे. लीला अनेक दिवसांपासून एजेला प्रपोज करण्याविषयी सांगत नव्हती. मात्र, एजे तिला प्रपोज करीत नसल्याचे पाहायला मिळाले. एजेने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्यानंतर लीलाच्या डोळ्यांत अश्रूदेखील आले. मात्र आता लीलाचा जीव धोक्यात असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
काश्मीरची ट्रिप लीलाच्या जीवावर बेतणार
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये लीला व एजे एकमेकांशी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. एजे लीलाला हाक मारत म्हणतो की, लीला, तुला सांगितलेलं मला न सांगता कुठेही जायचं नाही. त्यावर लीला त्याला म्हणते, “मला असं कळलेलं की, इथेच कुठेतरी देऊळ आहे. तिथे आपण जे मागू, ते मिळतं. मलाही तुमच्या दीर्घायुष्यासाठी मन्नत मागायची आहे.” लीलाचे हे बोलणे ऐकून एजे म्हणतो, “एवढं प्रेम कोण करतं लीला? लीला म्हणते मी करते आणि कायम करत राहणार. तितक्यात एक व्यक्ती लीलावर गोळी झाडतो. लीलाचा तोल जातो. एजे लीला म्हणून ओरडतो. त्याला हाताला रक्त लागते. तो पुढे म्हणतो, “म्हणून मी माझं प्रेम व्यक्त करत नव्हतो. ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो, ते सगळे सोडून जातात. तू मला सोडून नको जाऊ प्लीज. तुला मी काही होऊ देणार नाही.”
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर, ‘प्रेम व्यक्त करण्याची एजेंच्या मनातली भीती खरी ठरणार का, ही ट्रिप लीलाच्या जीवावर बेतणार का’, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, एजे व लीला काश्मीरला गेल्यापासून एक व्यक्ती त्यांचा पाठलाग करीत असल्याचे दिसत होते. तो त्यांना मारण्याच्या उद्देशाने आल्याचे पाहायला मिळाले. आता हा तो नेमका कोण, त्याला किशोरने पाठवले होते की आणखी कोणी, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याबरोबरच एजे लीलाला वाचवण्यासाठी काय करणार, यामागे नेमके कोण आहे, याचा शोध एजे घेऊ शकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.