हो, नाही म्हणता म्हणता लवकरच आता एजे (अभिराम जहागीरदार) आणि लीला लग्नबंधनात अडकणार आहेत. अलीकडेच एजे आणि लीलाचा साखरपुडा पार पडला. आता मेहंदी सोहळा रंगणार असून या सोहळ्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खास हजेरी लावला आहे. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
‘झी मराठी’ वाहिनीवर १८ मार्चपासून ‘नवरी मिळे हिटलरला’ नवी मालिका सुरू झाली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. या मालिकेत अभिनेता राकेश बापटने साकारलेला AJ (अभिराम जहागीरदार) व वल्लरी विराजने साकारलेली लीला या दोघांना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळतं आहे. दोघांची जोडी चांगली हिट झाली आहे. आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असून उद्या मेहंदी सोहळा असणार आहे. एजे व लीलाच्या मेहंदी सोहळ्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खास परफॉर्मन्स करणार आहे. याचा व्हिडीओ ‘मराठी चित्रसृष्टी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओत, सोनाली राखडी रंगाच्या लेहंग्यात पाहायला मिळत आहे. ती एजे व लीलाच्या मेहंदी सोहळ्यात तिच्याच ‘सावर रे मना’ गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. सध्या सोनालीच्या या डान्स परफॉर्मन्सचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत राकेश बापट व वल्लरी विराज व्यतिरिक्त शर्मिला शिंदे, माधुरी भरती, सानिका काशीकर, भूमिजा पाटील, भारती पाटील, शीतल क्षीरसागर, उदय साळवी, आलापिनी निसळ, मिलिंद शिरोळे, राज मोरे, असे अनेक कलाकार मंडळीत आहेत. सध्या या मालिकेची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढताना दिसत आहे.