Navri Mile Hitlerla : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील एजे ( अभिराम ) आणि लीलाची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. आता एजे आपल्या मनातलं प्रेम लीला समोर कधी व्यक्त करणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. लीलाने एजेला फिल्मी स्टाइल ग्रँड प्रपोज करायला सांगत काही अटी घातल्या आहेत. त्याच अटी आता एजे कशाप्रकारे पूर्ण करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नुकताच ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये एजे लीलाची पहिली अट पूर्ण करताना दिसत आहे.

एजेने प्रपोज करण्यासाठी लीला उपोषण करते. यावेळी तिला सरोजिनी साथ देते. पण, लीलाने उपोषण मोडण्यासाठी एजे तिचा आवडता नाष्टा करतो. पण काही केल्या लीला उपोषण सोडत नाही. दुसऱ्या बाजूला सूना लीलावर लक्ष ठेवून असतात. शेवटी एजे स्वतः उपाशी राहण्याचा निश्चय करतो. त्यामुळे लीलाचा नाईलाज होतो. मात्र, लीला आपल्या म्हणण्यावर ठाम असते.

लीला एजेला म्हणते, “मला प्रपोज करावंच लागेल.” पण एजेच्या मनात खंत असते की, जी गोष्ट अंतराबरोबर झाली ती लीलाबरोबर होऊ नये. म्हणून तो अंतराच्या फोटो जवळ जाऊन त्याच्या मनातली भीती बोलून दाखवतो की, जेव्हा जेव्हा त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं तेव्हा ती व्यक्ती त्याच्यापासून दुरावली आहे. लीलाला त्याला गमवायचं नाहीये. पण लीलाचा हट्ट म्हणून एजे अखेर तिला विचारतो नक्की तुला कसं प्रपोजल हवं आहे? तेव्हा लीला त्याला एकदम फिल्मी स्टाइलमध्ये ग्रँड प्रपोजलच्या करून दाखवा असं सांगते. तसंच लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करण्याची पहिली अट घालते. हीच अट एजे पूर्ण करतो.

‘झी मराठी’ने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये एजे लोकलच्या महिला डब्यात चढताना दिसत आहे. त्यानंतर सर्व महिला एजेला बाहेर जाण्यासाठी सांगतात. “हा महिलांचा डबा आहे…आधी बाहेर जा”, असं सगळ्या महिला एजेला म्हणतात. मग एजे सर्व महिलांना शांत करतो आणि सांगतो, “माझ्या बायकोची इच्छा होती की, मी महिला डब्यातून प्रवास करावा.” त्यानंतर एक महिला म्हणते, “तुमची बायको नशीबवान आहे. कोण आहे ती बायको?” मग लीला सगळ्यांसमोर उठून एजेची बायको असल्याचं सांगताना दिसत आहे. शेवटी एजे म्हणतो, “ये तो बस शुरुआत हैं आगे आगे देखो होता हैं क्या.”

दरम्यान, एकाबाजूला एजे आणि लीलाचं प्रेम बहरत असलं तरी दुसऱ्याबाजूला त्यांच्या आजूबाजूला संकट घोंघावत आहे. किशोर लीलाला जीवे मारण्याचा प्लॅन करतो आणि त्यासाठी तो एजे आणि लीलाच्या मागे माणसं पाठवतो.

Story img Loader