Zee Marathi Navari Mile Hitlerla : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत सध्या एजे आणि लीलाचं प्रेम बहरत जात असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सतत कठोर वागणाऱ्या अभिराम जहागीरदारला लीला आयुष्य कसं जगतात हे शिकवते आणि बघता-बघता एजे खरंच लीलाच्या प्रेमात पडतो.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत काही दिवसांपूर्वीच एजे-लीला हनिमूनसाठी काश्मीरला गेल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा घरी परतल्यावर एजेने आपली बायको लीलाला तिचं करिअर करण्यासाठी परवानगी दिल्याचं पाहायला मिळत आहे. लीला अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी फोटोशूट करत असते. यामध्ये तिच्या तीन सासवा अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, “काहीही झालं तरी मला फक्त तुमची साथ हवीये” असं लीला एजेला सांगते.

काश्मीरमध्ये लीलाला गोळी लागल्यापासून एजे तिच्या बाबतीत खूप पझेसिव्ह झालेला असतो. तो सतत बायकोची काळजी करताना दिसतो. आता लवकरच या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. आता हा ट्विस्ट आल्यावर एजे-लीला एकत्र राहतील की, पुन्हा दुरावतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मालिकेत एजेची पहिली पत्नी पुन्हा आली…

एजे-लीला एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले असताना अचानक मालिकेत एजेच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीची एन्ट्री होणार आहे. मालिकेत अंतरा जहागीरदार परत येणार आहे. एजे आणि लीला या दोघांना अंतरा परत आल्याचं पाहून मोठा धक्का बसतो. कारण, काही वर्षांपूर्वीच तिचा मृत्यू झालेला असतो. पहिल्या पत्नीच्या निधनानंतरच एजेचं वागणं बदलेलं असतं. यानंतर तो आईच्या प्रेमाखातर लीलाशी लग्न करतो. पण, लीला तिच्या चांगल्या वागण्याने एजेचं मन जिंकून घेते.

आता अंतराच्या येण्याने एजे-लीलाच्या लव्हस्टोरीला नवीन वळण मिळणार आहे. अंतरासाठी एजे लीला सोडेल की, कायम तिच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अनेक वर्षांनी जहागीरदारांच्या घरी परतणारी अंतरा एजे-लीलाच्या प्रेमाकडे कोणत्या दृष्टीने पाहणार, तिच्या परत येण्याचं, तिच्या मृत्यूचं नेमकं काय रहस्य आहे या गोष्टी लवकरच प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहेत.

दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एजेची पहिली पत्नी अंतराची भूमिका अभिनेत्री माधुरी भारती साकारत आहे. येत्या १७ मार्चपासून ही मालिका रात्री ११ वाजता प्रसारित केली जाणार आहे.