Zee Marathi Navri Mile Hitler La : ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत सध्या एजे म्हणजेच अभिराम जहागीरदार लीलाच्या प्रेमाच पडल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सध्या मालिकेत लीला आणि एजेचं नातं एका वेगळ्या वळणावर आहे. लीला घरी कबूल करते की, तिला स्वयंपाक येत नाही. त्यामुळे एजे तिला खीर बनवायला शिकवतो. लीला ती खीर अंतराच्या फोटोसमोर ठेवते, ज्यामुळे एजे नाराज होतो. लीला एजेला समजावून सांगते, “अंतरा माझ्यासाठी मैत्रिणीसारखी आहे, खीर तिच्यासमोर ठेवणं योग्य वाटतं.” एजे तिच्या सकारात्मक दृष्टीकोनाचं कौतुक करतो.
आता हळुहळू एजेच्या मनात लीलाविषयी प्रेम निर्माण होतं. आपण लीलाशिवाय जगू शकणार नाही याची जाणीव एजेला झालेली असते. पण, आता एजे ही सर्वांसमोर केव्हा मान्य करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मन आणि बुद्धीच्या खेळात, एजे कुठल्या निष्कर्षावर पोहोचणार? हे लवकरच स्पष्ट होईल. पण, अशातच आता मालिकेत एक नवीन एन्ट्री होणार आहे.
‘झी मराठी’ वाहिनीने अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ७ जानेवारीला मालिकेत एक नवीन एन्ट्री होईल असं स्पष्ट केलेलं आहे. या पोस्टला “तुम्हाला काय वाटतं? जहागीरदारांच्या घरी येणारी ही नवी पाहुणी कोण असेल? कमेंट्समध्ये सांगा” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. लांब वेणी, केसात गजरा आणि साडी नेसून या अभिनेत्रीचा पाठमोरा लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणीही नसून वल्लरी विराज म्हणजेच लीलाच आहे असं म्हटलं आहे. मालिकेत लीला वेगळ्या रुपात येणार अशाही कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर लिहिल्या आहेत. तर, काही युजर्सनी मालिकेचा ट्रॅक प्लीज बदलू नका अशाही कमेंट्समध्ये लिहिल्या आहे. नेटकरी जहागीरदारांच्या घरी येणारी ही नवी पाहुणी लीलाच आहे यावर ठाम आहेत.
![Zee Marathi Navri Mile Hitler La :](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/01/leela.jpg?w=830)
आता ही नवीन पाहुणी नक्की लीला आहे की दुसरी कोणी…हे येत्या ७ जानेवारीला स्पष्ट होईल. दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका रोज रात्री १० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाते.