Navri Mile Hitlerla : ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये सध्या एजे व लीलाच्या प्रेमाचा बहर पाहायला मिळत आहे. एजे लीलाच्या प्रेमात पडल्यामुळे तो लीलाची प्रत्येक अट पूर्ण करताना दिसत आहे. सुरुवातीला जिमी शेरगील रिषितासाठी ट्रेनच्या लेडीज डब्यात चढून प्रपोज करतो अगदी तसंच एजेने केलं. लोकलच्या डब्यात चढून लीलासमोर प्रेम व्यक्त केलं. त्यानंतर लीलाची दुसरी अट पूर्ण केली. छान थंड प्रदेशात एजेने घेऊन जाण्याची लीलाची इच्छा होती. एजेने हीदेखील इच्छा पूर्ण केली.

एजे व लीला सध्या काश्मीरमध्ये आहेत. या बर्फाळ प्रदेशात फिल्मी स्टाइलमध्ये एजेने लीलाला प्रपोज केलं. पण, या काश्मीर दौऱ्यात लीलाचा जीव धोक्यात असल्याचं एका प्रोमोमधून समोर आलं आहे. ‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर काही तासांपूर्वी एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत लवकरच ट्विस्ट येणार असल्याचं दिसत आहे.

या प्रोमोमध्ये सुरुवातीला लीला एजेला म्हणते, “मला गिटार वाजवायला जमेल का?” तर एजे म्हणतो, “का जमणार नाही?” मग लीला म्हणते, “तुम्ही मला शिकवता का? प्लीज.” त्यानंतर एजे लीलाला गिटार वाजवण्याचे धडे देताना पाहायला मिळत आहे. मात्र, तितक्यात एजेला एक फोन येतो आणि तो लीला जवळून निघून जातो. दुसऱ्या बाजूला हातात बंदूक घेऊन एक व्यक्ती लीलाच्या समोर बसलेला दिसत आहे. जो लीलावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे आता या काश्मीर दौऱ्यात नेमकं काय घडतंय? आणि मालिकेत कोणता नवा ट्विस्ट येतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा दिवसेंदिवस प्रेक्षक वर्ग वाढताना दिसत आहे. या मालिकेतील एजे व लीलाची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. तसंच इतर पात्रांनी देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Story img Loader