एखादी नवीन मालिका प्रदर्शित होणार असेल तर त्याची गोष्ट, नवीन कलाकार, नवीन पात्रे, नवीन ठिकाण अशा विविध बाबींमुळे प्रेक्षकांना त्याबाबत उत्सुकता असते. जसजशी मालिका पुढे जाते, तसतशी ती घरातील एक होत जाते. कालांतराने काही मालिकांतील प्रेक्षकांचा रस संपतो, तर काही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतात. मालिकेतील पात्रांचा आनंद म्हणजे आपला आनंद, त्यांचं दु:ख म्हणजे आपलं दु:ख, आपल्या आवडत्या पात्रांच्या शत्रूला वाईट बोलण्यापासून ते त्यांचं सर्व व्यवस्थित व्हावं यासाठी प्रार्थना करण्यापर्यंत प्रेक्षक एखाद्या मालिकेमध्ये स्वत:ला गुंतवतात. अशाच लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlerla) मालिका आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. एका वर्षानंतरही प्रेक्षकांचे या मालिकेवरील प्रेम तसेच असल्याचे दिसते. मालिकेत पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असलेले दिसतात. लीला-एजेची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आता मालिकेला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. वल्लरी विराजनेदेखील सोशल मीडियावर गेल्या वर्ष भरातील फोटो, व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सानिका काशिकर, भूमिजा पाटील यांनीदेखील सोशल मीडियावर व्हिडीओ, फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळत आहेत. या सगळ्यात अभिनेत्री आलापिनीने एक फोटो शेअर करत सर्वांचे मन जिंकले आहे. आलापिनीने नवरी मिळे हिटलरला मालिकेत रेवती ही भूमिका साकारली आहे.
नवरी मिळे हिटलरला मालिकेतील रेवतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्याबरोबर लीला व एजे उर्फ अभिराम दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, “रेवतीच्या केकमुळे यांच्या एकत्र येण्याला एक वर्ष झालं “, हा फोटो शेअर करताना तिने लीलाची भूमिका साकारणाऱ्या वल्लरी विराजला देखील टॅग केले आहे. तिच्या या फोटोवर काहींनी हार्ट इमोजी शेअर केली आहे. तर काहींनी कॅप्शनचे कौतुक केले आहे.
दरम्यान, आता नवरी मिळे हिटलरला मालिकेत पुढे नेमके काय घडणार, कोणते वळण येणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.