मराठी अभिनेता किरण माने ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे प्रसिद्धीझोतात आले. किरण मानेंनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तल्लख बुद्धी वापरुन केलेल्या खेळीने घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही त्यांची दखल घेणे भाग पडले. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील टॉप ५ सदस्यांपैकी किरण माने एक होते. परंतु, त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर किरण मानेंना चाहत्यांकडूनही भरभरुन प्रेम मिळालं. मानेंचं साताऱ्यात जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर अनेक कार्यक्रमांत किरण मानेंचा सत्कारही करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी किरण मानेंना फोन केला होता. त्यांच्या फोरमच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मानेंना उपस्थित राहण्याची विनंती सुनेत्रा पवार यांनी केली होती. किरण मानेंनी याबाबत सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा>> “तुला वॅक्सिंग करण्याची गरज आहे” हॉट फोटो शेअर केल्यामुळे ४३ वर्षीय अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले “सून येण्याच्या वयात…”

“किरणजी, मी बारामतीहून सुनेत्रा पवार बोलतीये. यावर्षी आमच्या फोरमच्या वर्धापनदिनादिवशी तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून यावं अशी आम्हा सर्वांची मनापासून इच्छा आहे.” फोरमचं काम मला माहित होतं. त्यामुळे एका क्षणात होकार दिला.

…अजितदादांच्या पत्नी सुनेत्रावहिनींनी बारामतीमध्ये एनव्हायरमेन्टल फोरमच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जागृतीचं अफाट काम केलंय! एखाद्या राजकीय नेत्याच्या कुटूंबियांनी पदाचा, अधिकारांचा, आर्थिक सबलतेचा, जनाधाराचा, सामाजिक प्रतिष्ठेचा वापर समाजोपयोगी कामांसाठी कसा करावा, याचं उत्तम उदाहरण आहे हे.

कार्यक्रमादिवशी संवाद साधताना वहिनींचा निसर्ग, प्राणी, पक्षी, झाडं यावरचा सखोल अभ्यास पाहून मी अक्षरश: थक्क झालो! पर्यावरणशास्त्र, हवामानबदल, प्रदूषण, प्राणी-पक्षी याबद्दल सर्वांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये अवेअरनेस यावा यासाठी त्या अथक परीश्रम घेतात. हल्ली मोबाईल गेम्समध्ये अडकलेल्या लहान मुलांना खुल्या मैदानात आणून लगोरी, सूरपारंब्या, गोट्या, विटीदांडू अशा अनेक लुप्त होत चाललेल्या खेळांच्या स्पर्धाही भरवल्या जातात. आजच्या बदललेल्या जीवनशैलीत खूप मोलाचं काम आहे हे. काल पर्यावरणप्रेमी अनुज खरे यांना ‘वसुंधरा पुरस्कार’ आणि विविध क्षेत्रात जगभर नांव कमावणार्‍या निवडक बारामतीकरांना ‘बारामती आयकॉन’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं.

बारामती हे माझं जन्मगांव. कोर्‍हाळे बुद्रुक माझं आजोळ. माझ्यावर निरपेक्ष आणि अतोनात प्रेम करणारे, कुठल्याही संकटात माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणारे माझे मामा तानाजीबापू, नंदूआबा, तात्या आणि कुटुंबीय…सन्मित्र नितिन यादव, महादेव बालुगडे, अमोल काटे, अमर महाडिक…असे अनेक ‘जिवातले गणगोत’ बारामतीनं मला दिले. अशा भूमीत, अशा समाजभान जपणार्‍या कार्यक्रमात, आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रीत करावं यासारखा दुसरा आनंद नाही. याप्रसंगी माझ्या माणसांच्या नजरेत दिसलेलं कौतुक आणि अभिमान, ही माझी यापुढच्या संघर्षातली शिदोरी आहे…

हेही वाचा>> “पंजाबी गायक व कलाकारांकडून गँगस्टर पैसे घेतात का? ” लॉरेन्स बिश्नोई उत्तर देत म्हणाला, “बॉलिवूडप्रमाणे…”

किरण मानेंची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. मानेंनी सुनेत्रा पवार यांच्याबरोबरचे कार्यक्रमातील काही फोटोही शेअर केले आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर किरण माने दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar wife sunetra pawar call bigg boss marathi fame kiran mane actor shared post kak