‘झी मराठी’वरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा कार्यक्रम काही आठवड्यांपूर्वी सुरु झाला. या कार्यक्रमात अनेक राजकारणी, नेतेमंडळी यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे. याच कार्यक्रमाच्या येत्या भागात अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. नुकतंच त्यांनी या कार्यक्रमात रोखठोक भाष्य केले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक उलथापालथ होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून एक गट सरकारमध्ये सहभागी झाला. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली या गटातील एकूण ९ आमदारांनी पहिल्याच दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी खुद्द अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी खासदार अमोल कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता नुकतंच अवधूत गुप्तेंच्या प्रश्नांना अमोल कोल्हेंनी सविस्तर उत्तर दिली आहेत.
आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”
या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक अवधूत गुप्ते याने अमोल कोल्हेंना काही प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांना एका गोळीचा फोटो दाखवत ही डोकेदुखी गोळी आहे असे सांगितले. त्यावर अवधूतने ही गोळी कोणाला द्याल?, असा प्रश्न अमोल कोल्हेंना विचारला. त्यावर त्यांनी एका क्षणात देवेंद्र फडणवीस असे उत्तर दिले.
यानंतर अवधूतने “स्मरणशक्ती वाढवण्याची गोळी कोणाला द्याल?”, अशी विचारणा केली. त्यावर अवधूत गुप्तेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देईन असे सांगितले. “कारण दरवर्षी २ कोटी रोजगार येणार होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पटीने वाढणार होतं. त्यामुळे ही गोळी मी त्यांना पाठवेन”, असेही ते म्हणाले.
अमोल कोल्हे यांनी दिलेलं या उत्तराची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच आगामी भागाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या रविवारी हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे.