इंटरनेटमुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या, सहजरित्या उपलब्ध झाल्या अन् स्मार्टफोन्सनी तर लोकांची जीवनशैलीच बदलून टाकली. अगदी हाताच्या एका क्लिकवर तुम्हाला हवी असलेली वस्तू तुमच्या दाराशी उपलब्ध होऊ लागली. ई-कॉमर्स, क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली अन् यातूनच ‘स्विगी’, ‘झोमॅटो’सारखे पर्याय उपलब्ध झाले. आज हे दोन्ही फूड डिलिव्हरी ब्रॅंड एकमेकांचे कट्टर स्पर्धक असले तरी दोन्ही ब्रॅंड हे भारतात अत्यंत लोकप्रिय आहेत अन् या सगळ्यांचा एक इमानदार असा युझरबेस आहे. यापैकीच ‘झोमॅटो’च्या काही वापरकर्त्यांना त्याचे सीइओ दीपींदर गोयल यांनी दुखावल्याचे जबरदस्त चर्चा होत आहे.

‘झोमॅटो’चे संस्थापक दीपींदर गोयल हे सध्या ‘शार्क टँक इंडिया’च्या सीझन ३ मुळे चर्चेत आहेत. या नव्या सीझनमध्ये त्यांनी नुकतीच एंट्री घेतली असून या कार्यक्रमामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. नुकतंच दीपींदर यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे ते चांगलेच चर्चेत आहेत, यावरुन त्याच्यावर नेटकरी आणि ‘झोमॅटो’चे बरेच वापरकर्ते नाराज झाले आहेत. कित्येकांनी ‘झोमॅटो’चे अॅप्लिकेशनदेखील डिलिट केले असल्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात.

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केलेला हृतिक-दीपिकाचा ‘फायटर’ येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे मिळणार पाहायला?

दीपींदर गोयल यांनी देशातील शाकाहारी लोकांना नजरेसमोर ठेवून एक आगळावेगळा प्रयोग त्यांच्या ‘झोमॅटो’च्या माध्यमातून सुरू केला. नुकतंच त्यांनी शाकाहारी लोकांसाठी शाकाहारी हॉटेलमधूनच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेत त्यांनी ‘प्युअर व्हेज फ्लीट’ ही एक नवी संकल्पना सुरू केली. याच्या माध्यमातून शाकाहारी लोकांना फक्त आणि फक्त शुद्ध शाकाहारी हॉटेलमधूनच खाद्यपदार्थ डिलिव्हर करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

दीपींदर गोयल यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. ते यात लिहितात, “भारतात शाकाहारी सेवन करणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे अन् आम्हाला त्यांच्याकडून एक अत्यंत महत्त्वाचा असा अभिप्राय मिळाला. तो अभिप्राय असा की ही लोक त्यांचे अन्न शिजवण्याबाबत अन् ते डिलिव्हर करण्याबाबत ते फारच काळजी घेतात. त्यांची ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही ‘प्युअर व्हेज मोड’सह ‘प्युअर व्हेज फ्लिट’ आजपासून लॉंच करत आहोत जो १००% शुद्ध शाकाहारी लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.”

पुढे दीपींदर आपल्या पोस्टमध्ये लिहितात, “या नवीन मोडमध्ये आम्ही काही शुद्ध शाकाहारी हॉटेल्सची एक यादी शॉर्टलिस्ट करणार आहोत अन् त्यातून मांसाहारी पदार्थ पुरवणाऱ्या हॉटेल्सना वगळणार आहोत. आमच्या ‘प्यूअर व्हेज फ्लिट’मधून केवळ आणि केवळ शुद्ध शाकाहारी हॉटेल्समधूनच पदार्थ पुरवले जाणार आहेत. म्हणजेच कोणताही मांसाहारी पदार्थ किंवा नॉन-व्हेज हॉटेलमध्ये तयार झालेला शाकाहारी पदार्थ आमच्या ग्रीन डिलिव्हरी बॉक्समध्ये जाणार नाही याची काळजी घेणार आहोत. ही सेवा कोणतेही राजकीय किंवा धार्मिक प्राधान्य समोर ठेवून पुरवली जात नाहीये याची नोंद घ्यावी.”

‘झोमॅटो’च्या या नव्या प्रयोगाला सोशल मीडियावर मिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही लोकांनी दीपींदर गोयल यांच्या या नव्या पद्धतीचं स्वागत केलं आहे, तर बऱ्याच लोकांना ‘झोमॅटो’ची ही स्ट्रॅटजी पटलेली नाही. ‘झोमॅटो’ची ही स्ट्रॅटजी लोकांमध्ये फुट पाडणारी आहे, भेदभाव करणारी आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. मुकेश या सोशल मीडिया युझरने दीपींदर यांची पोस्ट शेअर करत लिहिले, “आम्हा शुद्ध मांसाहारी लोकांनादेखील अशीच सर्व्हिस मिळायला हवी, आमच्या अन्नपदार्थात कमी प्रोटीन असलेल्या पदार्थांची भेसळ आम्हाला चालणार नाही.”

आणखी एका युझरने ट्वीट करत लिहिलं, “हा भेदभाव त्वरित थांबवा, मी एक शुद्ध मांसाहारी व्यक्ती आहे, शाकाहारी पदार्थांचे हे उदात्तीकरण थांबवा.” तर आणखी एका युझरने लिहिलं, “झोमॅटो हे जातिवादाला खतपाणी घालत आहे.” ‘झोमॅटो’च्या या ‘प्युअर व्हेज फ्लिट’साठी दीपींदर यांनी डिलिव्हरी पार्टनरच्या युनिफॉर्मचा अन् डिलिव्हरी बॉक्सचा रंग बदलून हिरवा केला, यावरुनही त्यांना लोकांचा प्रचंड रोष पत्करावा लागला. यानंतर त्यांनी युनिफॉर्म आणि डिलिव्हरी बॉक्सच्या रंगाबाबतचा निर्णय मागे घेत लाल रंगच पुढे ठेवण्यात येणार असल्याचं दीपींदर यांनी ट्वीट करत स्पष्ट केलं.