छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय ठरलेला अवधूत गुप्तेचा ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या कार्यक्रमाबद्दल सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. पण आता प्रेक्षक या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. दुसऱ्या भागात अभिनेता श्रेयस तळपदे, तर तिसऱ्या भागामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर आता या कार्यक्रमाच्या पुढील भागाचे प्रोमो समोर येऊ लागले आहेत. पुढील भागामध्ये खासदार संजय राऊत हजेरी लावणार आहेत. पण या कार्यक्रमामध्ये कलाकारांपेक्षा नेत्यांना पाहुणे म्हणून बोलवण्यात येत असल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत.
या कार्यक्रमाच्या नवीन भागाचा एक प्रमुख नुकताच समोर आला. त्यावर कमेंट करत नेटकरी त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत. एकाने लिहिलं, “इतर चॅनल्स कमी पडले का! इथे पण राजकारण! आवरा.” तर दुसरा म्हणाला, “गुप्ते तिथे राजकारणी असं नाव ठेवा.” तर तिसऱ्याने लिहिलं, “अरे आम्ही बातम्यांमध्ये हेच बघतो. तुम्ही काहीतरी वेगळं दाखवा.” तर आणखी एकाने लिहिलं, “आता हा कार्यक्रम बघणं बंद…कारण सांगायला नको.”
आणखी एक नेटकरी म्हणाला, “खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम झी ने फक्त राजकारण्यांना एकमेका विरोधात उखळ्या पाखळ्या काढता याव्या म्हणूनच सुरू केलाय का? एक श्रेयस तळपदे सोडला तर कार्यक्रम सुरू झाल्यापासून फक्त राजकारणी दिसत आहेत या शोमध्ये. एक मनोरंजक कार्यक्रम म्हणून ह्याला ट्रीट करावं. उगाच राजकारण्यांना एकमेकांची मापं काढायला प्लॅटफॉर्म करून देऊ नये किंवा झी मराठी चॅनलला न्यूज चॅनल म्हणून तरी डिक्लेयर करावं.”