मागील तीन महिन्यांपासून मराठी टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत राहिलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी ५. पहिल्यांदाच रितेश देशमुखने होस्ट केलेल्या या शोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला, परिणामी या शोने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले. मात्र ब्लॉकबस्टर ठरलेला हा शो १०० ऐवजी फक्त ८० दिवसांत संपवण्यात आला, त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. ती नाराजी आताही दिसून येत आहे.
कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर करत बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले पुन्हा एकदा रंगणार असल्याची घोषणा केली आहे. कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर याचा प्रोमो पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा ग्रँड फिनालेचा थरार रंगणार असल्याचं यात म्हटलंय. मात्र हिंदी बिग बॉससाठी हा शो ७० दिवसांत संपवला, अशा कमेंट्स या व्हिडीओवर प्रेक्षकांनी केल्या आहेत.
सूरज चव्हाण विजेता बिग बॉस मराठी ५ चा विजेता ठरला. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना कलर्स मराठीवर हा शो पाहता येणार आहे. ‘खास प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा तोच कल्ला, तोच थरार, बिग बॉसचा फिनाले पुन्हा रंगणार. २७ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर’, असं कलर्स मराठीच्या प्रोमोमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा – सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ गाण्यावर अभिजीत सावंतने काढले भन्नाट सेल्फी! नेटकरी म्हणाले, “बाईSSS…”
नेटकऱ्यांच्या प्रोमोवर कमेंट्स
‘शो पूर्ण १०० दिवस चालवला असता तर, तसंही तो हिंदी बिग बॉस कोणी बघत नाही आता हे परत दाखवून काय मिळणार?’ ‘आम्ही कुठे आग्रह केला की परत दाखवा,’ ‘बिग बॉस बंद झाल्यापासून टीआरपी मिळत नाही चॅनलला,’ ‘हिंदी बिग बॉसला टीआरपी नाही आणि कोणी पाहतही नाही. केवळ हिंदीसाठी झुकलात आणि १०० चे ७० दिवस केले. आता कोणी हिंदी पाहत नाही म्हणून केविलवाणा प्रयत्न,’ अशा कमेंट्स यावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. तर गायक अभिजीत सावंत उपविजेता ठरला. तिसऱ्या क्रमांकावर निक्की तांबोळी राहिली. चौथ्या क्रमांकावर धनंजय पोवार अन् पाचव्या क्रमांकावर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर राहिली. तर, सहाव्या क्रमाकांवर जान्हवी किल्लेकरने ९ लाख रुपये घेत हा शो सोडला होता.
कलर्स मराठीने पुन्हा एकदा बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. या फिनाले एपिसोडला पुन्हा प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल.