Bigg Boss Marathi 5 व्या पर्वातील सदस्यांची पहिल्या दिवसापासून चर्चा झाली. या पर्वात अनेक गोष्टी बदलल्याचे पाहायला मिळाले. स्पर्धक म्हणून कलाकारांपेक्षा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची संख्या जास्त असलेली दिसली आणि चर्चांना उधाण आले. या सगळ्यामध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेला स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण हा आहे. आता त्याच्याविषयी चॅनेलचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

सूरज चव्हाणविषयी काय म्हणाले केदार शिंदे?

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाविषयी अनेक खुलासे केले आहेत.

सूरज चव्हाणविषयी बोलताना केदार शिंदेंनी म्हटले, “मला आठवतंय सूरजची पहिल्या दिवशी एन्ट्री झाल्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले होते. पहिल्या दिवशी त्याला पाठवल्यानंतर, ‘तुम्ही काय खालच्या स्तराला बिग बॉस नेत आहात का?, कोणीही आणताय’, अशा पद्धतीचं लिहिलेलं सोशल मीडियावर पाहायला मिळालं. मला असं वाटतं, आम्हाला सूरजमधली माणुसकी दिसली होती आणि ती माणुसकी लोकांपर्यंत पोहचवणं कलर्स मराठी म्हणून आमचं सगळ्यांचं काम होतं.”

“सुषमा, राजेश, मी, इंडोमॉलचे कास्टिंग डायरेक्टर्स, आमची नॉन फिक्शन टीम जेव्हा पहिल्यांदा सूरजचं नाव आलं तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडला होता की, हा माणूस कसं करेल तिथं गेल्यानंतर; कारण तो पूर्णत: वेगळा माणूस आहे. तो खरा आहे, हे सगळं मान्य आहे. शंभर दिवस एका माणसाला आत टाकल्यानंतर तो कसा रिॲक्ट करेल, त्याला हे सगळं जमेल का, त्याला या सगळ्या सवयी माहीत आहेत का, या सगळ्याचा विचार करणं महत्त्वाचं होतं. पण, मी आणि सुषमा आम्ही ठाम होतो. कारण बिग बॉस हा कुठल्याही कॅटेगरीचा गेम असू शकत नाही. तो माणसांच्या भावभावनांचा खेळ आहे आणि जी माणसं आहेत, ती कुठून यावीत याला काही बंधनं नसावीत.”

हेही वाचा: “मी ही सूरजसारखा तळागाळातून आलोय…”, अरबाज पटेलचं वक्तव्य, म्हणाला, “त्याच्याकडे गेम नाहीये, पण…”

पुढे बोलताना ते म्हणतात, “सूरज ज्या गावातून येतो, त्याला स्वत:ला बिग बॉस माहीत होतं की नव्हतं माहीत नाही. पण, त्याला भेटल्यानंतर मला त्याच्यातील खरेपणा नक्कीच जाणवला. आपल्याला कोणी संधी दिली होती, कोणीतरी विचार केलाच असेल की करा, बघूयात काय होतंय ते. त्यानंतर ३० वर्षांनंतर आज मी इथे आहे. आपण संधी देण्याइतपत मोठे नाही; आपली मदत झाली या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहचण्यासाठी आणि आज तो लोकांचा आवडता आहे. याचे पूर्ण मार्क्स कास्टिंग डायरेक्टर्सना दिले पाहिजे.

“जर मी पॉलीश नसतो तर मी सूरज असतो…”

स्पर्धक बिग बॉसच्या घरात जाण्याआधी मी त्यांना भेटलेलो आहे. त्यांच्याबरोबर अर्धा-पाऊण तास वेळ घालवलेला आहे, असे केदार शिंदेंनी सांगितले. त्यावर कोणाबरोबरची भेट लक्षात राहिली, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना केदार शिंदेंनी सूरजचे नाव घेतले. त्यांनी म्हटले, “कदाचित मी पूर्वी सूरजसारखा असेन, थोडा पॉलीश असेन. कारण मी शाहीर साबळे साहेबांचा नातू होतो, त्यामुळे मला तशा संधी मिळाल्या. पण, मी जर पॉलीश नसतो तर मी सूरज असतो, त्यामुळे मला तो सूरज लक्षात राहतो”, असे केदार शिंदेंनी म्हटले आहे.