सध्याच्या टेलिव्हिजनवरील मालिका ह्या त्यातील वादग्रस्त अन् काही हास्यास्पद कंटेंटमुळे चांगल्याच चर्चेत असतात. मध्यंतरी पाकिस्तानी मालिकांमधील बरेच सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते अन् त्या सीन्सची बऱ्याच लोकांनी खिल्ली उडवली होती. मराठी मालिकांच्या बाबतीतही आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते. नुकतंच स्टार प्रवाह चॅनलवरील ‘अबोली’ या मालिकेचा प्रोमो एका विचित्र कारणामुळे चर्चेत आला आहे.
मालिकांच्या कथानकात येणारे चित्र विचित्र ट्विस्ट आणि टर्न्स हे प्रेक्षकांसाठी काही नवीन नाहीत. आता ‘अबोली’ मालिकेतील अशाच एका ट्विस्टमुळे प्रेक्षकांनी त्या मालिकेची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. अंकुश आणि अबोलीची गोष्ट मांडणाऱ्या ‘अबोली’चा नवा प्रोमो नुकताच समोर आला.
आणखी वाचा : “रोमान्सला वयाची…” ७२ वर्षीय शबाना आझमींसह दिलेल्या किसिंग सीनवर ८७ वर्षीय धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
मालिकेत अपघातानंतर अंकुश स्वतःची स्मरणशक्ती गमावून बसतो, त्यासाठी अबोली बरेच प्रयत्न करते पण त्यात काही तिला यश मिळत नाही. यादरम्यान एका अपघातात अबोलीचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. यानंतर अंकुशला त्यांचा भूतकाळ काहीसा आठवायला लागतो. ज्यावेळी अबोलीचा मृतदेह चाळीत अंतिम दर्शनासाठी ठेवलेला असतो तेव्हा अंकुश तिच्याजवळ हार घालायला येतो अन् खूप भावूक होतो.
त्यावेळी चितेवर झोपलेली अबोली डोळे उघडून जागी होते अन् अंकुशचा हात पकडते. अंकुशला ती म्हणते, “‘जे बोलायचं ते आता बोला सर, असंही सत्य उद्या समोर येणार आहे.” चितेवर झोपलेली अबोली अशी अचानक जागी झालेली पाहून तिथले सगळेच जण हबकतात. प्रेक्षकांना मात्र प्रोमोमधील हा सीन फारच हास्यास्पद वाटला आहे.
सोशल मीडियावर लोकांनी या सीनला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. प्रोमो खाली कॉमेंट करत लोकांनी या मालिकेचे चांगलीच खिल्ली उडवली आहे. एका युझरने कॉमेंट करत लिहिलं की, “अबोली साठी नेमकी संजीवनी कुणी आणली असेल?” तर एकाने कॉमेंटमध्ये लिहिलं, “ही मालिका पाहून मीच अबोल झालो आहे.” याबरोबरच एकाने कॉमेंट करत लिहिलं, “दुसऱ्याचा जीव घ्यायला येणारा यम स्वतः आत्महत्या करून मेला असेल.”