‘उदे गं अंबे कथा साडेतीन शक्तिपीठांची’ ही पौराणिक मालिका अल्पावधीत प्रेक्षकांची लाडकी झाली आहे. या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकार काम करताना दिसत आहेत. सध्या मालिकेत ऋषिकुमार जमदग्नी आणि राजकुमारी रेणुका यांच्या विवाहसोहळ्याचे विधी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. या विधींदरम्यानच यलम्माने रेणुकाची भेटवस्तू ऋषिकुमार जमदग्नींपर्यंत पोहोचवली आहे. ही भेट यल्लमाकडे देताना तिने जमदग्नींसाठी निरोपही दिल्याचे पाहायला मिळाले. ही भेटवस्तू म्हणजे प्रेमाची खूणगाठ असल्याचे रेणुकाने म्हटले. ही भेटवस्तू म्हणजे मृदगंध आहे. अभिनेता देवदत्त नागे व अभिनेत्री मयूरी कापडणे हे कलाकार या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकांत दिसत आहेत. आता या मालिकेत एक नवीन एन्ट्री झाली आहे. आता उदे गं अंबे मालिकेत कोणत्या कलाकाराची एन्ट्री झाली आहे, हे जाणून घेऊ.
अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मीची ‘उदे गं अंबे कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या मालिकेत एन्ट्री होणार आहे. या मालिकेत ती देवी लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे. नित्यश्रीने याबाबत तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले, “ऋषिकुमार जमदग्नी आणि राजकुमारी रेणुका यांच्या हळदी आणि विवाहसोहळ्यात साक्षात देवी लक्ष्मीचेदेखील आगमन होणार आहे. त्यामुळे पाहायला विसरू नका माझी नवीन भूमिका आणि नवीन मालिका”, असे स्पष्ट करून, या मालिकेत नवीन भूमिका साकारत असल्याचे नित्यश्रीने म्हटले आहे.
अभिनयाबरोबरच नित्यश्री पॉडकास्टसाठीदेखील ओळखली जाते. तिच्या पॉडकास्टमध्ये सयाजी शिंदे, सुबोध भावे यांसारख्या इतर कलाकारांनीही हजेरी लावल्याचे पाहायला मिळते. त्याबरोबरच नित्यश्री विविध विषयांवर लिहीत असल्याचे दिसते. तिने लिहिलेल्या गोष्टी ती सोशल मीडियावर तिच्या आवाजात शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फॉलोअर्सची संख्या मोठी असल्याचे दिसते. आता नित्यश्रीची उदे गं अंबे, कथा साडेतीन शक्तिपीठांची या मालिकेतील नवीन भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची या मालिकेत ऋषिकुमार जमदग्नी आणि राजकुमारी रेणुका यांच्या विवाहसोहळ्याचे विधी सुरू झाले असून, आता मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मालिकेत प्रमुख भूमिकेत असणारा अभिनेता देवदत्त नागे हा त्याने साकारलेल्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. वीर शिवाजी, देवयानी, जय मल्हार, तुझ्यात जीव गुंतला अशा मालिकांत त्याने भूमिका साकारल्या होत्या.