स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. अल्पवधीच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. दरम्यान या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अशात मालिकेत लवकर मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कोळी कुटुंबाच्या घरात संशयाचे वादळ निर्माण झाले आहे. आणि या वादळात मुक्ता व सागरचा संसार तुटणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
स्टार प्रवाहने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत मालिकेत पुढील भागात काय घडणार आहे, हे बघायला मिळत आहे. ज्यामध्ये इंद्रा मुक्ताला घराबाहेर काढताना दिसत आहे. गेल्या भागात मुक्ता एका तरुणाला घरातील दागिने देत असल्याचे सागर बघतो. मुक्ता घरी आल्यानंतर सागर तिला याबाबत प्रश्न विचारतो. इकडे तिजोरीतून दागिने गहाळ झाल्याचे बघून इंद्रा चांगलीच संतापलेली असते. त्यातून मुक्ताने तिजोरीतून दागिने काढून एका तरुणाला दिल्याचे कळताच इंद्राचा पारा आणखीनच वाढतो. ती मुक्ताला वाट्टेल ते बोलते. मात्र, मुक्ता काहीच उत्तर देत नसल्याचे बघून मुक्ता सागरचा विश्वासघात करत असल्याचा इंद्राचा समज होतो व त्या रागातच ती मुक्ताला घराबाहेर काढते.
तर इंद्राने मुक्ताला घराबाहेर काढताच सागर मुक्ताचा हात धरून तिला पुन्हा घरात घेऊन येतो आणि म्हणतो, नको तेव्हा तोंड चालतं तुमचं आणि गरज आहे तेव्हा शांत, जिने या घरची अब्रू सांभाळली आहे, ती या घरची सून या घराबाहेर जाणार नाही. सागरच्या या वागण्याने इंद्राला मोठा धक्का बसलेला बघायला मिळत आहे. मुक्ताने दागिने कोणाला दिले? मुक्ताच्या बोलण्यावर सागरचा विश्वास बसेल का? याची उत्तरे येत्या भागात प्रेक्षकांना मिळणार आहेत.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका आहे. या मालिकेतील मुक्ता, सागर, सई, इंद्रा या सगळ्याच पात्रांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. त्यामुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे.