Laughter Chefs 2: ‘कलर्स टीव्ही’ वाहिनीवरील ‘लाफ्टर शेफ्स २’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जून २०२४मध्ये ‘लाफ्टर शेफ्स’चा पहिला सीझन आला होता, जो सुपरहिट झाला. त्यामुळे ‘लाफ्टर शेफ्स’ दुसरा सीझन काही महिन्यांत सुरू करण्यात आला. हा सीझनही प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडला आहे. त्यामुळे १ एप्रिलला संपणारा ‘लाफ्टर शेफ्स २’ पुढे वाढवण्यात आला आहे. पण, कॉन्ट्रॅक्टनुसार मनारा चोप्राने हा शो सोडला आहे. म्हणूनच आता करण कुंद्रानंतर ‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये जुन्या कलाकारांची एन्ट्री झाली आहे.

‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये काही कलाकार सोडले तर बरेच नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. रुबीना दिलैक, एल्विश यादव, अभिषेक कुमार, समर्थ जुरेल, मन्नारा चोप्रा, अब्दु रोजिक हे सहा जण ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’मध्ये झळकले. पण अब्दु रोजिक आणि मन्रारा चोप्राने या शोला रामराम केला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अब्दु रोजिकच्या जागी करण कुंद्राची एन्ट्री झाली. तसंच आता मन्नारा चोप्राची जागा निया शर्माने घेतली आहे. त्यामुळे नियाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

निया शर्मा म्हणाली, “माझ्यासाठी पुन्हा शोमध्ये येणं खूप सोपं होतं. कारण प्रत्येकजण मला हा प्रश्न विचारतं होतं की, पुन्हा शोमध्ये कधी येणार. त्यामुळे अशातच पुन्हा ‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये सहभागी होण्याचा खूप आनंदा आहे आणि मी खूप उत्साही आहे. ८ एप्रिलला दोन भागाच चित्रीकरण केलं आहे.” सुदेश लहरींसह निया शर्मा दिसणार आहे.

करण कुंद्रा व निया शर्मानंतरही ‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये आणखी दोन जुन्या कलाकारांची एन्ट्री झाल्याचं समोर आलं आहे. अली गोनी ‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये पुन्हा पाहायला मिळणार असून त्याने येताच स्टार जिंकला आहे. अली गोनीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अली गोनी आणि राहुल वैद्य पापाराझींना पोज देताना दिसत आहे. तेव्हा राहुल म्हणतो की, “माझा अली पुन्हा आला.”

एवढंच नव्हेतर, ‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये रीम शेखचं देखील पुनरागमन झालं आहे. तिचा सेटवरील व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये रीमला स्टार मिळालेला दिसत आहे. कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाहने निया आणि रीमच्या पुनरागमनावर आनंद व्यक्त केला आहे. म्हणाले, “जुनं कुटुंब पुन्हा येत आहे. आता बघा किती मजा करतो.” कृष्णा व कश्मिरा जुन्या कलाकारांच्या येण्याने खूप उत्साहित आहे.