अनेक टीव्ही कलाकारांना काम मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अनेकांना वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पण या सर्वांवर मात करत त्यांनी इंडस्ट्रीत नाव कमावलं, स्वतःचं स्थान निर्माण केलं. अशीच अभिनेत्री आहे जिने अवघ्या १४ व्या वर्षी बोर्डाची परीक्षा चालू असताना वडिलांना गमावलं, आईने तिला मोठं करण्यासाठी खूप संघर्ष केला. आता ती यशस्वी टीव्ही अभिनेत्री असून मुंबईत तिचं स्वतःचं घर आहे. ही अभिनेत्री म्हणजे निया शर्मा होय.
घटस्फोटानंतरही पूर्वाश्रमीच्या पत्नीला डेट करतोय बॉलीवूड अभिनेता; म्हणाला, “आमचं वैवाहिक जीवन…”
एका मुलाखतीत नियाने सांगितलं होतं की ती १४ वर्षांची असताना १० वी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान तिने वडिलांना गमावलं. ‘झूम टीव्ही’च्या मुलाखतीत निया म्हणाली, “मला गणित शिकवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत होता. हा त्यांच्यासाठी सर्वात कठीण काळ होता. ते नेहमी प्रार्थना करायचे की मी चांगले गुण मिळवेल, पण मला कधीच चांगले गुण मिळाले नाहीत. आपल्या पालकांनी आपल्यासाठी केलेला त्याग आपण कधीही मोजू शकत नाही. आम्हाला शिकवसाठी माझ्या पालकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी आम्हाला फिरायला नेलेलं, ती प्रत्येक ट्रीप मला आठवते.”
नियाच्या आईने अनेक आव्हानांना सामोरं जात तिला मोठं केलं. ‘झलक दिखला जा १०’ दरम्यान नियाने स्टेजवर तिच्या आईची ओळख करून दिली होती. “पहिल्यांदा माझी आई कॅमेरासमोर आली आहे. मला या इंडस्ट्रीत ११ वर्षे झाली आहेत. माझा विश्वास बसत नाही की ती सिंगल मदर (एकल आई) आहे. तिने आम्हाला कठीण काळातून एकटीने बाहेर काढलं. आज आम्ही जे आहोत ते फक्त तिच्यामुळे आहोत,” असं निया त्यावेळी म्हणाली होती.
निया पुढे म्हणाली, “जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा मी १४ वर्षांची होते. अनेक वर्षे आम्ही संघर्ष केला. प्रचंड वैताग यायचा. माझ्या भावाने खूप कमी वयात नोकरी सुरू केली, जेणेकरून तो आम्हाला मदत करू शकेन. त्यामुळे लोक माझ्याबद्दल काय म्हणतात हे मला कळतं तेव्हा त्याचा माझ्यावर अजिबात परिणाम होत नाही कारण माझ्या आईने आमच्यासाठी काय केलंय, याची जाणीव मला आहे. तिला मित्र नाही, तिला आमच्याशिवाय कोणीही नाही. माझ्या आईने आमच्या सर्व नातेवाईकांना दिल्लीत सोडलं आणि माझ्या भावावर आणि माझ्यावर लक्ष केंद्रित केलं. तिने मला एवढेच सांगितलं ‘जोपर्यंत तू जे करतेय ते तुला बरोबर वाटतंय, तोपर्यंत तू ते कर. तुला हवे ते कपडे तू घाल. कोणालाही न घाबरता तुला आवडतात त्या गोष्टी कर.”
निया शर्माने तिच्या संघर्षाबद्दलही सांगितलं होतं. तिला पैशांसाठी लोकांकडे अक्षरशः भीक मागावी लागली होती, ती स्वतःच्या पैशांसाठी अनेकदा स्टुडिओबाहेर थांबायची. “तुम्ही पैशांसाठी प्रचंड मेहनत करता, पण तुम्हाला तुमच्या पेमेंटसाठी भीक मागावी लागते. मी त्यातून गेले आहे. मी अनेकांशी पैशांसाठी भांडले आहे. तुम्ही मला बालिश म्हटलं तरी चालेल, पण मी पैसे मिळेस्तोवर स्टुडिओबाहेर उभे राहायचे. जोपर्यंत माझे पेमेंट होत नाही तोपर्यंत मी काम करणार नाही. असे अल्टिमेटम मी अनेकदा दिले, कारण मला माझे पैसे मिळविण्याचा दुसरा कोणताही मार्ग माहीत नव्हता. अनेकदा निर्मात्यांनी मला माझ्याच पैशांसाठी भीक मागायला, रडायला आणि विनवण्या करायला लावलं आहे,” असं नियाने ‘बॉलीवूड बबल’च्या मुलाखतीत म्हटलं होतं.
आयुष्यात वडिलांना गमावलं, पैशांसाठी इतका संघर्ष करावा लागला, पण आता निया आनंदी जीवन जगत आहे. तिच्याकडे आता मुंबईत आलिशान थ्री-बीएचके घर आहे. तिच्याकडे व्होल्वो एक्ससीसह ऑडी Q7 आणि ऑडी A4 अशा महागड्या गाड्या आहेत. ती आईबरोबर मुंबईत राहते.