‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम आणि त्यातील कलाकार त्यांच्या विनोदाने प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवत आहेत. त्यामध्ये नम्रता संभेराव, समीर चौघुले, गौरव मोरे, शिवाली परब, दत्तू मोरे, निखिल बने अशा सर्वच कलाकारांनी त्यांच्या विनोदी शैलीने घराघरात हक्काचं स्थान मिळवलं आहे. निखिल बने यानं त्याच्या मनोरंजन विश्वातील कामाची सुरुवात याच कार्यक्रमातून केली आहे. अशात आता त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील त्याच्या पहिल्या दिवसाची आठवण सांगितली आहे.
निखिल बनेने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला एक मुलाखत दिली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर पहिल्यांदा आल्यावर तो घाबरला होता, असं त्यानं सांगितलं आहे. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर तो कशा पद्धतीने पोहोचला हेदेखील त्यानं या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. निखिल बनेची आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा लेखक व सहायक दिग्दर्शक विनायक पुरुषोत्तम यांची चांगली मैत्री होती. निखिल बने म्हणाला, “मी आणि विनायक दोघांनी मिळून एका कॉलेजमध्ये यूथ फेस्टिवलला एकांकिका, नाटक, पथनाट्य हे सर्व बसवलं होतं. त्याच वेळी २०१८ मध्ये त्यानं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करण्यास सुरुवात केली. तो गोस्वामीसरांना असिस्ट करीत होता. त्यादरम्यान गोस्वामीसरांबरोबर काम करताना त्याला कॉलेज आणि हे काम अशा दोन्ही गोष्टी मॅनेज कराव्या लागत होत्या.”
“त्यावेळी दोन्ही कामं सुरू असताना तो मला त्याच्याबरोबर थांबायला सांगायचा. तो नसताना मी कॉलेजच्या मुलांची तालीम घ्यावी यासाठी तो मला थांबायला सांगत होता. याच युथ फेस्टिवलच्या फायनलचे राउंड वांद्रे येथे सुरू होते आणि त्यावेळी हास्यजत्रेच्या सेटवरसुद्धा शूटिंग सुरू होतं. त्या दिवशी मी यूथ फेस्टिवलच्या फायनच्या राउंडसाठी तयारी करत होतो. आम्ही तेथे पोहोचलो आमचा प्रयोग झाला होता आणि मी तिथेच निवांत बसून होतो”, असं निखिल बनेनं पुढे सांगितलं.
मला विनायकचा फोन आला…
निखिल बने पुढे म्हणाला, “कॉलेजच्या यूथ फेस्टीवलमध्ये असतानाच मला विनायकचा फोन आला. त्याने मला स्टुडिओला बोलावून घेतलं. मला सुरुवातीला काहीच समजेना. मी कशासाठी विचारलं? तो म्हणाला की, तू ये तर खरं. त्यावेळी मी मिरा रोडला आयुष्यात पहिल्यांदा गेलो होतो. तिथे जाण्याचा रस्ताही मला माहीत नव्हता. त्यानंच मला सर्व रस्ता सांगितला आणि त्यानुसार मी तिथे पोहोचलो.”
गेट उघडताच थंडी वाजली
“जेव्हा सेटवर गेलो तेव्हा पहिलं गेट उघडताच मला फार जास्त थंडी वाजली. सर्व मोठ्या लाईट्स आणि भव्य-दिव्य सेट पाहून मला काही कळेच ना, आपण कुठे आलो आहोत, असं मला वाटू लागलं. मी थोडा घाबरलो होतो. त्यानंतर सेटवर पोहोचल्याचं मी विनायकला फोन करून सांगितलं. तो आला आणि मला गोस्वामीसरांकडे घेऊन गेला. त्यानं सरांना सांगितलं की, सर आपल्याला एक असिस्टंट हवा होता, तर हा माझा मित्र आहे आणि आम्ही आधी एकत्र काम केलं आहे, असं त्यानं सांगितलं”, असं निखिल बने म्हणाला.
पुढे निखिलनं सांगितलं. “सुरुवातीला विनायकनं मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. मला समजतच नव्हतं की, खरंच मी इथे आलो आहे. कारण- समोर सर्व मोठे कलाकार होते; ज्यांना टीव्हीवर पाहून मी मोठा झालोय. एकदा सर मला म्हणाले तू असा घाबरून का आहेस. घाबरू नकोस; बिनधास्त रहा. त्यानंतर मी सर्वांमध्ये हळूहळू रुळत गेलो.”