Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम नेहमीच सर्वत्र चर्चेत असतो. या शोचे चाहते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आहेत. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. याशिवाय दर आठवड्यात या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी प्रमोशन निमित्ताने उपस्थित राहत असतात. हास्यजत्रेच्या मंचावर येत्या आठवड्यात दोन खास पाहुण्या येणार आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात येत्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री निक्की तांबोळी आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी सहभागी होणार आहेत. सध्या या दोघीही एका खास कारणामुळे चर्चेत आहेत. या दोघी सुद्धा ‘सोनी टिव्ही’वरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत. या शोमध्ये सेलिब्रिटींना विविध टास्क देण्यात येतील आणि स्पर्धेत येणारी सगळी आव्हानं पार करत या कलाकारांना आपलं पाककौशल्य सिद्ध करायचं आहे. ‘बिग बॉस’ गाजवल्यानंतर आता हा नवा शो गाजवण्यासाठी निक्की सज्ज झाली आहे.
हास्यजत्रेच्या शोमध्ये प्राजक्ता माळीने या दोघींचं स्वागत केलं. यानंतर कोकणासंदर्भात एक स्किट या शोमध्ये सादर केलं जाणार आहे. “कोकणातल्या प्रत्येक माणसाला शिमग्याला गावी जाणं गरजेचं आहे का?” असा प्रश्न विचारताच सगळे विनोदवीर एकत्र म्हणतात, “हो…” यानंतर उषा नाडकर्णी मालवणी भाषेत म्हणतात, “अरे एवढो मोठो सण…चल तुका नाचायचा कसा ते शिकवतंय”
वनिता खरात, प्रभाकर मोरे, प्रथमेश शिवलकर, श्रमेश बेटकर यांच्यासह निक्की आणि उषा नाडकर्णी यांनी कोकणातील पारंपरिक गाण्यावर ठेका धरल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. निक्की तांबोळीच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर, “बाई काय हा प्रकार”, “निक्की काय हा प्रकार”, “आता निक्कीमुळे हा एपिसोड पाहावा लागणार” अशा कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ हा शो २७ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता हा शो प्रसारित केला जाणार आहे.