Nikki Tamboli : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे निक्की तांबोळी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली. तिला रिअॅलिटी शोजची ‘क्वीन’ म्हणून ओळखलं जातं. ‘बिग बॉस हिंदी’, ‘द खतरा-खतरा’ असे अनेक शो निक्कीने गाजवले आहेत. सध्या ती ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या शोच्या माध्यमातून निक्कीच्या चाहत्यांना तिचं पाककौशल्य पाहायला मिळत आहे. आता शो अंतिम टप्प्याकडे पोहोचला असून, या कार्यक्रमात तिला एक खास व्यक्ती भेटायला येणार आहे.
‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये निक्कीचे वडील एन्ट्री घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने या शोमध्ये वडील माझ्याशी बोलत नाहीयेत. माझं अभिनय क्षेत्रातील करिअर त्यांना पटलं नव्हतं. असं वक्तव्य केलं होतं. तसेच आता फोन केल्यावर कदाचित ते उचलतील की नाही…मला माहिती नाही असंही निक्की म्हणाली होती. पण, या बाप-लेकीच्या नात्यातील दुरावा अखेर मिटणार आहे. कारण, खास निक्कीला होळीनिमित्त भेटण्यासाठी तिचे वडील सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये येणार आहेत.
निक्की वडिलांना पाहताच सर्वप्रथम त्यांच्या पाया पडली. बाबांना पाहून ती भावुक झाली होती, निक्कीचे डोळे सुद्धा पाणावले होते. कारण, बऱ्याच दिवसांनी निक्की आपल्या वडिलांना भेटली होती. यावेळी तिचे वडील म्हणाले, “४ वर्षे झाली…तिचा जतिन दादा आम्हाला सोडून गेला तेव्हापासून आम्ही कोणीच होळी साजरी केली नाहीये.”
निक्कीच्या सख्ख्या भावाचं नाव जतिन तांबोळी होतं. निक्कीचा भावावर खूप जास्त जीव होता. जतिनला क्षयरोगाचं निदान झालं होतं त्यामुळे तो प्रचंड खचला होता. २०२० मध्ये त्याला करोनाची लागण झाली आणि निक्कीच्या भावाचं निधन झालं. त्या दिवसापासून अभिनेत्रीने होळी साजरी केली नसल्याचं तिच्या वडिलांनी या शोमध्ये सांगितलं. बाबांना अचानक शोमध्ये आलेलं पाहून आणि भावाच्या आठवणीत निक्की खूप भावुक झाली होती.
दरम्यान, याआधी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या फॅमिली वीकमध्ये निक्कीचे आई-बाबा तिला भेटण्यासाठी शोमध्ये आले होते. निक्की आणि तिच्या वडिलांच्या भेटीच्या भावनिक प्रोमोवर सध्या नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहे. आता निक्की ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ हा शो जिंकणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.